Kalyan Fake Currency: बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंकुश सिंह असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी अंकुश सिंह किरकोळ विक्रेत्यांना बनावट नोटा देऊन त्या चलनात आणत होता. याबाबतची माहिती मिळताच कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. तसेच आरोपीकडून 13 हजार रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत. नकली नोटांमध्ये शंभर रुपये, दोनशे रुपये आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. आरोपी अंकुश सिंह हा मूळचा दिल्लीतील रहिवासी आहे आणि तेथे तो रॅपिडो बाइक ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याला या नकली नोटा बाजारात चालवण्यासाठी कोणी दिल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत.
(नक्की वाचा: डोंबिवलीत घरफोड्या करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला, चोरटे गजाआड)
कसे उघडकीस आले प्रकरण?
कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील बाजारपेठेमध्ये एक तरुण शंभर दोनशे रुपयांमध्ये काही वस्तू खरेदी करतो. पण व्यवहारासाठी ज्या नोटांचा वापर करतोय, त्या बनावट असल्याचा संशय एका फळविक्रेत्याला आला. याबाबतची माहिती त्याने त्याच्या मित्राला दिली. मित्राने लगेचच ही माहिती कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनला दिली.
(नक्की वाचा: पतीसोबत झाले कडाक्याचे भांडण, पत्नीने दिव्यांग मुलाला फेकले मगरींच्या तोंडी; कारण...)
तपासादरम्यान मोठी रोकड जप्त
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता स्टेशन परिसरात संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि 20 मिनिटांतच तरुणाच्या मुसक्या आवळल्या. चौकशीदरम्यान आरोपी अंकुश सिंह दिल्लीमध्ये रॅपिडो बाइक ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली. कल्याणमध्ये तो एका नातेवाईकाच्या घरी आला होता. झडतीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून 13 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा बनावट होत्या.
(नक्की वाचा : दाभोसा धबधब्यावर स्टंट करणे बेतले जीवावर, 120 फूट खोल डोहात उडी मारल्याने पर्यटकाचा मृत्यू)
NIAला दिली माहिती
दिल्लीतीलच एका व्यक्तीने अंकुश सिंहला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दिल्या होत्या. हे काम पूर्ण केल्यानंतर त्याला पुढेही काम दिले जाईल, असे आश्वासनही त्या व्यक्तीने दिले. या व्यक्तीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक दिल्लीकडे रवाना झाले आहे. याची माहिती एनआयएला देखील देण्यात आली आहे.
बनावट नोटा जप्त
महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कल्याण रेल्वे स्टेशनबाहेरील बाजारपेठेत एक व्यक्ती बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीस निरीक्षक वाघ आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी अंकुश सिंहला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे".