man dies due to pothole : अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी आज पुन्हा एकदा तरुणाचे जीवन हिरावून घेतलंय. कोपरगावच्या इंदिरापथ भागातील आदित्य देवकर या तरुणाचा, येवला नाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे.
यातच रस्त्यावरचे दिवे बंद असल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण झाले आहे. त्यातही खड्ड्यात पाणी साचल्याने खड्डा किती खोल आहे हेही लक्षात येत नाही. याच कारणामुळे आदित्य दुचाकीवरून जात असताना तोल गेला आणि अज्ञात वाहनाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत.
नक्की वाचा - Kalyan News: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
दरवर्षी या रस्त्यावर जीवघेणे अपघात घडत असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आणखी किती जणांचा जीव घेणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यभरात खड्ड्यांची समस्या वाढत चालली आहे. आतापर्यंत अनेकांचा खड्ड्यामुळे मृत्यू झाला आहे. अद्यापही रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही, त्यात पाऊस सुरू असल्याने ही समस्या अधिक वाढत चालली आहे. वाहतूक कोंडीबरोबरच खड्ड्यांमुळे प्रवाशांचा मृत्यू होत असल्याने सरकारने यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.