
अमजद खान
Kalyan News: रस्त्यातील खड्ड्यामुळे कल्याणमध्ये आणखी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. रोहन शिंगरे असं या तरुणाचं नाव आहे. रोहन शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा मुलगा आहे. खड्डयामुळे माझ्या भावाचा जीव गेला. आणखीन कोणाचा जीव जाऊ नये अशी मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया रोहनची बहिणी रिद्धी शिंगरे यांनी दिली आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील पिंपळेश्वर हॉटेल जवळ आधी खड्ड्यात बाईक आदळली. नंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने रोहनला फरफट नेले. 20 दिवसाापासून रोहनवर वाशीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तो मृत्यूशी झुंज देत होता पण अखेर त्याची प्राणजोत मालवली.
रोहन शिंगरे हा तरुण कल्याण पश्चिमेतील आरती सोसायटीत राहत होता. तो वाशी येथील आयसीआयसीआय बँकेत कामाला होता. कामावर जाण्यासाठी तो दररोज त्याच्या बाईकने कल्याण ते वाशी असा प्रवास करायचा. गेल्या चार वर्षांपासून तो बाईकवरुन प्रवास करायचा. 23 जुलैला तो नेहमीप्रमाणे बाईकने कामावर जाण्यासाठी निघाला. साडे नऊ वाजताच्या सुमारास त्याची बाईक कल्याण शीळ रस्त्यावरील पिंपळेश्वर हॉटेलजवळ पोहचली. त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यात त्याची बाईक जोराने आदळली. त्यामुळे रोहनचा तोल गेला. तो रस्त्यावर खाली पडला.
त्याच वेळी त्याच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली रोहनचा एक हात गेला. त्याच्या हातावरुन ट्रकचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्याच फोनवरुन काही जणांनी त्याच्या वडिलांना फोन करुन या अपघाताची बातमी दिली. हे ऐकताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. रोहनला प्रथम गजानन खाजगी रुग्णलायात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला वाशीतील महात्मा फुले ट्रस्टर रुग्णालयात दाखल केले. त्याचा एक हात काढावा लागला. त्याची प्रकृती सुधारत असताना अचानाक पुन्हा ती बिघडली.
उपचारा दरम्यान त्याचा १५ ऑगस्ट रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला. रोहन हा त्याच्या घरातील एकूलता एक मुलगा होता. येत्या वर्षभरात त्याचे लग्न करण्याचा विचार त्याच्या घरांची केला होता. त्या आधीच त्याचा खड्ड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी महापौर वैजयंती घोलप गुजर यांनी सांगितले की, रोडचे खड्डे त्यात पाणी भरले की, खड्डा कळत नाही. त्यात अपघाताने मृत्यू होतो. पावसाळयाच्या आधीच खड्डे बुजविले पाहिजे. रोहनची बहिण रिद्धी हिने सांगितले की, खड्डयामुळे माझ्या भावाचा जीव गेला. आणखीन कोणाचा जीव जाऊ नये. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे. असंही ती म्हणाले.
तर काही स्थानिकांनीही याबाबत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. वारंवार अशा घटना घडत आहेत. तरी देखील शासनाचे डोळे उघडत नाहीत. शासनाने यावर कठोर निर्णय घेतला पाहिजे. शासन सर्व सामान्यांकडून रोड टॅक्स घेते. सर्व सामान्य जनतेला काय मिळते? प्रत्येक वेळी घटना घडली की अधिकारी, शासन बोलते. फक्त दुख व्यक्त केले जाते. त्याच्या पलिकडे काही होत नाही अशी नाराजीही व्यक्त केली. शासनाने याचा विचार केला पाहिजे की, या घटना कशा टाळता येतील. भविष्यात अशा घटना होणार नाही याचा विचार केला पाहिजे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world