कल्याण लोकसभा मतदारसंघातील 50 हजार नावं गायब? डोंबिवलीकर मागणार उच्च न्यायालयात दाद

Kalyan Lok Sabha Election 2024 : 50 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब झाली आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
कल्याण लोकसभा मतदारसंघातील हजारो मतदारांची नावं गायब झाल्याची तक्रार आहे.
डोंबिवली:

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये या टप्प्यात मतदान होतंय.  कल्याण, डोंबिवली तसंच भिवंडी भागातल्या  मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. दर निवडणुकीत आवर्जून मतदान करणारे काही मतदारही आपले नाव मतदार यादीत नसल्याची तक्रार करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातल्या 50 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून वगळण्यात आली आहेत, असा अंदाज डोंबिवलीतील जागरुक नागरिक अक्षय फाटक यांनी केलाय.  मतदार यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांच्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करुन त्यांची माहिती मागवत आहे. सकाळपासून आत्तापर्यंत 550 मतदारांची नावं मिळाली आहेत. फक्त डोंबिवली मतदारसंघातल्या 50 हजार जणांची नावं डिलिट झाली असावीत, असा अंदाज फाटक यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रियेत दिला आहे. या विषयात हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करण्याचं आपण ठरवलं आहे. मतदार यादीतून नाव डिलिट झालेले जवळपास 90 टक्के जण याबाबत तक्रारदार होण्यास तयार असल्याचं फाटक यांनी सांगितलं.  

कल्याणमध्येही पडसाद

दर निवडणुकीत आवर्जून मतदान करणारे काही मतदारही आपले नाव मतदार यादीत नसल्याची तक्रार करत आहेत. कल्याण पश्चिमेला असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील केंद्रावर मतदारांनी अधिकाऱ्यांना त्यांची नावे नसल्याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला. 70 हजार पेक्षा जास्त नावं मतदार यादीमध्ये नसल्याचा दावा काही नागरिकांनी केलाय. निवडणूक आयोग किंवा राज्य सरकारनं या दाव्याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.