आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. दरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका मतदारसंघात पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महायुतीच्या राष्ट्रवादीच्या धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करण्यासाठी 500 रुपये व दारू वाटप करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांनी लातूर पोलीस अधीक्षक धाराशिव जिल्हाधिकारी यांना फोन करुन आपला संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत पैसे व दारू वाटल्याच्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा केल्याने ओमराजे संतप्त झाले असून निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे प्रकरण गंभीर असताना अदखलपात्र गुन्हा कसा नोंदविण्यात आला, असा सवाल निंबाळकरांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी ओमराजे यांना फोनवर आश्वासन दिल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - देशभरात तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान; राज्यात दिग्गजांचं भवितव्य पणाला
भाजपचा खरोसा गावातील माजी सरपंच प्रशांत डोके व ड्राइवर राहुल डोके यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये महिला व नागरिकांचा जबाब नोंदविण्यात आला असून गाडी, दारू आणि पैसे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.