मोहसिन शेख, प्रतिनिधी
महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी एकही मुस्लीम उमेदवार न दिल्यानं काँग्रेसमधील नाराजी उघड झालीय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री मोहम्मद आरिफ 'नसीम' खान (Naseem Khan ) यांनी त्यांच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलाय. खान मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यसाठी इच्छूक होते. पण, पक्षानं काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना तिथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खान यांची नाराजी उघड झाली. या नाराजीनंतर त्यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर मिळालीय.
AIMIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नसीम खान यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. 'NDTV मराठी' शी बोलताना जलील यांनी ही ऑफर दिलीय. त्याचबरोबर त्यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. 'काँग्रेस किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाही मुस्लिमाला तिकीट देणार नाही हे आम्हाला माहिती होतं. आता पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिलाय. तुम्हाला इतका राग आला असेल तर तुम्ही पक्ष सोडायला हवा होता,' या शब्दात जलील यांनी नसीम खान यांच्यावर निशाणा साधलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुम्ही पक्षाला लाथ मारली असती तर तुमच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली असती. त्यानंतरही मी आरिफ भाईंना सांगितलंय की तुम्हाला ही संधीचं सोनं करण्याची वेळ आहे. तुम्ही मुंबईतील मतदारसंघ सांगा त्या मतदारसंघात AIMIM पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल. आम्ही संपूर्ण तुमच्या पाठिशी उभं राहू. मी स्वत: तसंच ओवेसी तुमच्या प्रचारासाठी येतील. आम्ही आमचा निश्चित झालेला उमेदवार मागे घेऊन आरिफ भाई यांना उमेदवारी देऊ अशी ऑफर जलील यांनी दिलीय. जलील यांनी तसं ट्विटही केलं आहे.
काय म्हणाले होते नसीम खान?
नसीम खान यांनी यापूर्वी पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्ष विचारधारेपासून दूर गेला असल्याची टीका केली होती. काँग्रेसला मुस्लिमांची मतं हवी आहेत. मुस्लीम उमेदवार का नको?' असं सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मला विचारत आहेत. 'मी याच कारणांमुळे मुसलमानांना सामोरं जाऊ शकत नाही. माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही, असं पत्र नसीम खान यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना लिहलं आहे.