प्रतिनिधी, राकेश गुडेकर
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये अद्यापही पेच कायम आहे. नाशिकच्या जागेवरुन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी नाशिकच्या जागेबाबत निर्णय झाल्याचं सांगितलं. येत्या दोन दिवसात याची घोषणा करण्यात येईल असंही ते पुढे म्हणाले.
नाशिकच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे. नाशिक जागेबाबत निर्णयास्पद चर्चा झालेली आहे, आज किंवा उद्या बैठक होईल आणि नाशिकचा तिढा सुटेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी म्हटल्यानंतर संभ्रम वाढला आहे. नाशिकमधील विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे या जागेसाठी कमालीचे आग्रही आहे. ते वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत.
मात्र तटकरे यांनी नाशिकमध्ये महायुतीचा निर्णय झाल्याचं जाहीर केलं आहे. तटकरे यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना सांगितलं की, आज किंवा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बैठक होईल. आवश्यकता लागली तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी उपस्थित असेन आणि नाशिकचा तिढा नक्की सुटेल. इतर जागांचाही निर्णय त्या ठिकाणी होईल. साताऱ्याच्या जागेबाबत देखील चर्चा झालेली आहे. सामूहिक पत्रकार परिषदेत त्याबाबतचा सर्व खुलासा केला जाईल, असं तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान शेकापच्या जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांची 2019 ला साथ दिली नसती तर, ते रायगडच्या आणि राज्याच्या राजकारणातून कायमचे हद्दपार झाले असते असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी केला होता. याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, अलिकडे गीते साहेबांना काय झालंय मला माहीत नाही. 2019 मध्ये काँग्रेस, शेकाप माझ्यासोबत होता, याबाबत दुमत नाही. पण 2019 मध्ये गीते साहेबांसोबत मोदी साहेबांची ताकद, अखंड शिवसेना त्यांच्या पाठीमागे होती. हद्दपारीची भाषा त्यांच्या तोंडी जास्त शोभते, कारण 2019 मध्ये अनंत गीते यांनी जयंत पाटील यांचं संस्थान खालसा केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी दरपोक्ती देखील केली होती असा टोला तटकरे यांनी यावेळी लगावला. तसेच भावनेच्या नावावर, धर्माच्या नावावर, समाजाच्या नावावर काहीही न करता ज्यांना निवडणुकीत यश मिळतं त्यांच्या डोक्यात अशा पद्धतीच्या कल्पना असतात अशी देखील टीका तटकरे यांनी गीते यांच्यावर केली.
दरम्यान मी जमिनीवर पाय ठेवणारा, थेट जनतेशी संवाद करणारा कार्यकर्ता असल्याने माझ्या मनातला आत्मविश्वास हा वेगळा आहे. मी महायुतीचा उमेदवार आहे, शिवसेनेची ताकद, भाजपची ताकद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे पुन्हा या निवडणुकीत विजय नक्की आहे असं तटतके यावेळी म्हणाले.
बारामतीमध्ये भावा बहिणीच्या कराराबाबत रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या सुनील तटकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भावा बहिणीचा कुठला करार झाला आहे, मला माहीत नाही. पण 2019 मध्ये रोहित पवार भाजपकडे तिकीट मागायला गेले होते, कदाचित तो करार असावा असा टोला तटकरे यांनी लगावला. तसेच 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून भाजपकडे जावं यावर रोहित पवार यांची सही होती, त्या कराराची त्यांना आठवण झाली की काय माहित नाही असं देखील तटकरे यावेळी म्हणाले.