- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
- वडेट्टीवार यांनी नृत्यांगना गौतमी पाटील यांना प्रचारासाठी बोलावण्याचे समर्थन केले आहे.
- वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे.
योगेश शिरसाट
प्रचार सभेतील नृत्यावरून राजकीय वाद दिसून येऊ लागला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार अकोल्यात प्रचारार्थ आले होते. हनुमान चौक अकोट फाईल येथे त्यांनी या पार्श्वभूमीवर विरोधकांवर गंभीर आरोप केले. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचारासाठी नृत्यांगना गौतमी पाटील यांना बोलावलं होतं. या मुद्द्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करत सभेतील स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या टीकेला प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, गौतमी पाटील या एक कलाकार आहेत. त्या ओबीसी समाजातील मुलगी आहेत. त्या प्रचारासाठी नाचल्या तर यात गैर काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एखादी कलाकार काँग्रेसच्या विचारांनी प्रचारासाठी येत असेल, तर त्यात वावगं काहीच नाही, असंही ते म्हणाले.
वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांवर थेट निशाणा साधताना चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वास्तव मांडलं. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 पैकी 8 नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे. जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता भाजप चंद्रपूरमध्ये टिकते की नाही, हे मुनगंटीवारांनीच पाहावं, असा खोचक टोला त्यांनी लगावला. स्वतंत्र मजदूर पक्ष आमच्यासोबत नसून तो दहा वर्षांपूर्वीच काँग्रेसपासून वेगळा झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एमआयएमवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, एमआयएम हा भाजपचा भाट असून भाजप जे स्क्रिप्ट देईल तेच एमआयएमचे नेते वाचून दाखवतात. हिंदू–मुस्लिम मतांचे विभाजन करून मुस्लिम समाजाचे नुकसान करण्याचा हा डाव आहे. ओवेसी सुपारी घेऊन महाराष्ट्रात फिरत असून सेक्युलर मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. अकोटमध्ये झालेल्या भाजप–एमआयएम युतीवरही त्यांनी टीका करत, सत्तेसाठी दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली असल्याचं म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसचा ‘लाडकी बहीण' योजनेला कोणताही विरोध नाही. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींचा वापर भाजपकडून केला जात आहे. एकीकडे महागाई वाढवून महिलांच्या बटव्यातून पाच हजार रुपये काढले जातात आणि दुसरीकडे दीड हजार रुपये देऊन उपकार केल्याचा आव आणला जातो, असा आरोप त्यांनी केला. सरकारी निधीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा फंडा असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा परिणाम निवडणूक निकालावर होईल, असा इशाराही त्यांनी दिला. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊन निवडणुका कशा घेतल्या जात आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. जनता आता हुशार झाली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.