Akola News : अकोल्यात भाजप उमेदवाराला MIM–काँग्रेसचा पाठिंबा? छुप्या युतीची पुन्हा जोरदार चर्चा

या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात असून, अकोल्यात पुन्हा एकदा छुप्या युतीची चर्चा रंगू लागली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला 

Akola Election 2026 : अकोल्याच्या अकोट नगरपरिषदेत भाजपला एमआयएमकडून मिळालेल्या मान्य पाठिंब्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी या मुद्द्यावर भाजपवर टीकास्त्र सोडत, तत्त्वांशी तडजोड केल्याचा आरोप केला होता. या घटनेमुळे भाजपची प्रतिमा अडचणीत आली असतानाच, अकोट प्रकरणाचे पडसाद अद्यापही अकोला जिल्ह्यात जाणवत आहेत.

हिवरखेडमध्ये उपसभापती निवडणुकीत अनपेक्षित पाठिंबा

अकोटनंतर प्रथमच नगरपरिषद झालेल्या हिवरखेड नगरपरिषदेतील सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका 20 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकीत भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवाराला थेट एमआयएम व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सूचक व अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात असून, अकोल्यात पुन्हा एकदा छुप्या युतीची चर्चा रंगू लागली आहे.

समिती सभापतींच्या निवडी, पण अधिकृत माहितीचा अभाव

हिवरखेड नगरपरिषदेतील विविध समित्यांच्या सभापती पदांसाठी निवडी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आरोग्य समितीच्या सभापतीपदी वंदना राजेश वानखडे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी वैभव गावंडे, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी अजीज खा जमीर खां, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी प्रमिला रविंद्र मानकर, तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी प्रतिभा वीरेंद्र येऊल यांची निवड करण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीबाबत पत्रकारांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने संभ्रम कायम आहे.

Advertisement

नक्की वाचा - BMC Election 2026 : भाजपने निवडणूक लढवली असती तर...; शिंदे गटानंतर आता भाजपनेही व्यक्ती केली नाराजी

भाजपची भूमिका काय? अकोल्याचे लक्ष केंद्रित

महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून अनिता रविंद्र वाकोडे, तर शिवसेना गटाकडून शीतल प्रमोद पोके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या उमेदवारासाठी सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबी नाज अब्दुल सलमान, तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे नगरसेवक आजम खान यांनी सह्या केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या निवडणुकीत अनिता वाकोडे यांना चार मते, तर शीतल पोके यांना एक मत मिळाले. अकोट नगरपरिषदेत मिळालेल्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानंतर अकोला महानगरपालिकेत भाजपला दहा जागांचा फटका बसल्याची चर्चा असताना, हिवरखेडमधील या घडामोडींवर भाजप काय भूमिका घेते आणि वरिष्ठ नेते काय सल्ला देतात, याकडे आता संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.