जाहिरात

Ambernath Nagarparishad Election 2025: लग्नाचे वऱ्हाड की बोगस मतदार? अंबरनाथमधील त्या 208 महिलांचे गुपित काय?

Ambernath Nagarparishad Election 2025:   अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शहरात ठिकठिकाणी राड्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Ambernath Nagarparishad Election 2025:  लग्नाचे वऱ्हाड की बोगस मतदार? अंबरनाथमधील त्या 208 महिलांचे गुपित काय?
Ambernath Election 2025 : अंबरनाथमध्ये मतदानाच्या पूर्वसंध्येपासूनच राजकीय वातावरण तापले होते.
अंबरनाथ:

Ambernath Nagarparishad Election 2025:   अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शहरात ठिकठिकाणी राड्याच्या घटना समोर आल्या आहेत. नगराध्यक्ष पदासह एकूण 60 जागांसाठी ही निवडणूक होत असून मतदानाच्या पूर्वसंध्येपासूनच राजकीय वातावरण तापले होते. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून वाद झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस बळाचा वापर करावा लागला आहे.

EVM मध्ये छेडछाड झाल्याचा  खळबळजनक आरोप

पॅनल क्रमांक 5 मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उमेदवार शैलेश भोईर आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केला आहे. या आरोपांनंतर कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला.

या प्रकरणाची दखल घेत निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी सर्व ईव्हीएम मशीनची कसून तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच पुढील अधिकृत कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : अजित पवारांच्या टीममध्ये खळबळ; कोकाटेंच्या जागी 'मराठा कार्ड' की 'ओबीसी चेहरा'? सस्पेंस वाढला! )
 

पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप कार्यकर्त्यांना पकडले

मतदानाच्या आदल्या रात्री पॅनल क्रमांक 28 मध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दोन व्यक्तींना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा केला.

त्यांना निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या ताब्यात दिले. हे दोन्ही व्यक्ती भाजपचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात असून पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

महिलांची गर्दी आणि बोगस मतदानाचा संशय

कोहजगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये 208 महिला जमल्याची माहिती मिळताच काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी तिथे धाव घेतली. या महिलांना मुंब्रा, भिवंडी आणि मालेगाव येथून बोगस मतदानासाठी आणल्याचा गंभीर आरोप भाजप आणि काँग्रेसने शिवसेना शिंदे गटावर केला आहे. 

पोलिसांनी या सर्व 208 महिलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. काँग्रेस उमेदवार प्रदीप पाटील यांनी हा बोगस मतदानाचा मोठा कट असल्याचा आरोप केला, तर शिवसेना शिंदे गटाचे कृष्णा पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या मॅरेज हॉलमध्ये लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची राहण्याची सोय नसल्याने त्या तिथे थांबल्या होत्या, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

अंबरनाथमधील मातोश्री नगर परिसरातही तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार केला आणि जमावाला पांगवले. 

यासोबतच कोहोजगाव परिसरातही काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते बोगस मतदानाच्या मुद्द्यावरून आपसात भिडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. सध्या संपूर्ण शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com