अटल बिहारी वाजपेयींच्या 3 वाक्यांनंतर समजला देशाचा कौल

अटलबिहारी वाजपेयी यांनी या भाषणातील पहिल्या तीन वाक्यांनीच संपूर्ण सभा जिंकली. त्यांच्या भाषणाला मिळालेल्या प्रतिसादावरुन देशाचा मूड समजला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

देशात स्वातंत्र्यानंतर पहिली 3 दशकं काँग्रेसची एकहाती सत्ता होती. स्वातंत्र्य लढ्याची पुण्याई काँग्रेसच्या पाठीशी होती. त्याचा काँग्रेसला मोठा फायदा झाला. पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे पहिल्या तीन दशकांमध्ये देशाचे पंतप्रधान होते. 1977 साली देशात पहिल्यांदा सत्तांतर झाले. इंदिरा गांधी यांचा पराभव होऊन जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं.

का झाले सत्तांतर?

इंदिरा गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर देशात आणिबाणी लादण्याचा निर्णय घेतला. आणिबाणीच्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये डांबण्यात आले होते. इंदिरा गांधी यांचा हा निर्णय देशातील सामान्य मतदारांना आवडला नाही. त्यांनी आणिबाणी संपुष्टात येताच झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना सत्तेतून दूर केलं.

रामलीला मैदानात सभाआणिबाणीनंतर देशाचा मूड काय आहे समजण्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या सभेकडं पाहिलं जातं. विरोधी पक्षाच्या नेत्यांची जेलमधून मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या सभेचं आयोजन केलं होतं.

ज्येष्ठ पत्रकार 'तवलीन सिंह' यांच्या 'दरबार' या पुस्तकात रामलीला मैदानात झालेल्या त्या सभेचं सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.  ही सभा दुपारी चार वाजता सुरु झाली. अटलबिहारी वाजपेयी यांचा भाषण करण्यासाठी नंबर येईपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले होते.

अटलबिहारी वाजपेयींचे भाषण सूरु होण्यापूर्वी मैदान गच्च भरले होते. वाजपेयी हे लोकप्रिय वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं भाषण ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. वाजपेयी भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी ही उत्सुकता शिगेला पोहोचली. अटलजींनी या सभेत जोरदार भाषण केलं. त्या भाषणातील पहिल्या तीन वाक्यांनीच देशाचा मूड काय आहे हे स्पष्ट झाले.

Advertisement

3 जादूई वाक्य

वाजपेयींनी भाषणाला उभं राहिल्यानंतर गर्दीला शांत करण्यासाठी दोन्ही हात उंच केले. काही क्षण डोळे मिटले. त्यानंतर त्यांच्या नेहमीच्या शैलीत पहिलं वाक्य म्हंटलं, ' बाद मुद्दत के मिले है दिवाने...'

त्यांचं हे वाक्य ऐकताच लोकं आनंदानं ओरडू लागली. रामलीला मैदानातील टाळ्यांचा आवाज शिगेला पोहोचला. हा आवाज थोडा कमी झाल्यानंतर वाजपेयींनी दुसरं वाक्य सभेला दिलं. 'कहने सुनने को बहुत है अफसाने...'

Advertisement

सर्वांनी रामलीला मैदान डोक्यावर घेतलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर अटलजींनी तिसरं आणि महत्त्वाचं वाक्य म्हंटलं खुली हवा में जरा सांस तो ले लें, कब तक रहेगी आजादी...भला कौन जाने...

अटलबिहारी वाजपेयी यांनी या भाषणातील पहिल्या तीन वाक्यांनीच संपूर्ण सभा जिंकली. त्यांच्या भाषणाला मिळालेल्या प्रतिसादावरुन देशाचा मूड समजला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. इंदिरा गांधी देखील पराभूत झाल्या. जनता पक्षाचे नेते मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान बनले.

Advertisement
Topics mentioned in this article