Beed Lok Sabha 2024 जरांगे की मुंडे फॅक्टर भारी? 'बीड' च्या गडावर कुणाचा झेंडा?

Beed Lok Sabha Election 2024 : गेल्या तीन दशकांपासून मराठा विरुद्ध ओबीसी भोवती बीड जिल्ह्यात राजकारण सुरु आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती.

Advertisement
Read Time: 3 mins
Pankaja Munde vs Bajrang Sonawane : बीडचा गड भाजपा राखणार का?
बीड:

राज्यात जातीय अस्मिता टोकदार असलेल्या जिल्ह्यामध्ये बीडचा समावेश आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे हिंसक पडसाद या जिल्ह्यात उमटले होते. गेल्या तीन दशकांपासून मराठा विरुद्ध ओबीसी भोवती बीड जिल्ह्यात राजकारण सुरु आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती. विकासाच्या प्रश्नापेक्षा जातीय जाणीवा टोकदार करणारी निवडणूक म्हणून ही निवडणूक लक्षात राहणार आहे. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या प्रमाणात 4 टक्के वाढ झालीय. मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार यावर दोन्ही बाजूंनी हिशेब सध्या केला जातोय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बीडचा इतिहास

भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात बीडचा समावेश होतो. राज्यात भाजपाचा विस्तार करणारे गोपीनाथ मुंडे याच जिल्ह्यातले. 1996 पासून फक्त एका निवडणुकीचा अपवाद वगळता इथून सातत्यानं भाजपाचा उमेदवार खासदार झाला आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे इथून दोन वेळा निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं. यंदा भाजपानं प्रीतम मुंडे यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना मैदानात उतरवलं होतं.

( नक्की वाचा : Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला )
 

जातीय प्रचार

बीडमध्ये कायमच असणारा मराठा विरुद्ध ओबीसी हा मुद्दा या निवडणुकीतही धगधगता राहिल याची काळजी दोन्ही बाजूंनी घेतली गेली. उपोषणाने कुठे आरक्षण मिळते का? हे पंकजा मुंडे यांचं विधान चांगलंच गाजलं. शरद पवारांनी बीडमधील सभेत मनोज जरांगेंची आम्ही त्यांच्या उपोषणस्थळी भेट घेतल्याची आठवण करुन देत 'नेमका संदेश' मतदारांना ठसवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रचारसभेत कर्नाटकमधील ओबीसी आरक्षणात मुस्लीम वाटेकरी असल्याची आठवण करुन दिली. 

निवडणूक प्रचाराच्या गदारोळात मनोज जरांगे यांचे नारायणगडावर आगमन, पंकजा मुंडे यांच्या परळीमध्ये झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत उदयनराजेंची उपस्थिती, समाजमाध्यमांवर जातीय अस्मिता टोकदार करणाऱ्या संदेशांचा प्रसार या सर्व कारणामुळे ही निवडणूक लक्षात राहणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : दीर - भावजयीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार? )
 

बीडमधील समीकरण

परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे धनंजय मुंडे या निवडणुकीत भाजपाच्या बाजूनं होते. मुंडे बहिण-भावांच्या एकजूटीचा मोठा फायदा भाजपाला होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी फक्त बीड हा एकमेव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडं आहे. तर इतर पाच मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत. 

( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी? )
 

किती झालं मतदान?

बीड लोकसभा मतदारसंघात 2019 साली 66.17 टक्के मतदान झालं होतं. यंदा आष्टी मतदारसंघात 74.79, बीडमध्ये 66.09, गेवराई 71.43, केज 70.31, माजलगाव 71.61 आणि परळीमध्ये 71.31 टक्के मतदान झालंय. बीड मतदारसंघात यंदा एकूण 70.92 टक्के मतदान झालंय. वाढत्या उष्णतेमध्ये मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाला साथ देणार हे चार तारखेला स्पष्ट होईल.
 

Advertisement