जाहिरात

Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला

Nanded Lok Sabha Election 2024 : आजवर काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती आखणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यावर यंदा भाजपाचा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी होती.

Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला
Nanded : भाजपा विरुद्ध काँग्रेस लढतीत मतदारांचा कौल कुणाला?
नांदेड:

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये मोठे बदल झाले आहेत. मित्रपक्ष बदलले. दोन मोठ्या पक्षात फूट पडली. काही बड्या नेत्यांनी पक्षांतर केलं. या सर्व बदलांनतर ज्या लोकसभा मतदारसंघातील समीकरण सर्वाधिक बदललंय त्यामध्ये नांदेडचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडमध्ये काँग्रेसची जबाबदारी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता भाजपामध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकी मिळवली. आजवर काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती आखणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यावर यंदा भाजपाचा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी होती. या जबाबदारीत ते किती यशस्वी होतात त्यावरच त्यांची भाजपामधील पुढची वाटचाल निश्चित होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नांदेडचा इतिहास

शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र मुख्यमंत्री देणारा नांदेड हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. या मतदारसंघात 1952 पासून 2004 पर्यंत दोन निवडणुकांचा अपवाद (1977,1989) वगळता काँग्रेसचं वर्चस्व होतं. 2004 साली इथं पहिल्यांदा भाजपाचा खासदार निवडून आला. 2009 मध्ये ही जागा परत काँग्रेसनं मिळवली. 2014 साली संपूर्ण राज्यात मोदींची लाट होती. त्या लाटेत काँग्रेसचे दोनच उमेदवार विजयी झाले. काँग्रेसला निवडून देणाऱ्या दोन मतदारसंघात नांदेडचा समावेश होता. अशोक चव्हाण त्या निवडणुकीत विजयी झाले होते.

मागील लोकसभा निवडणुकीत चित्र बदललं. भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना पराभवाचा धक्का दिला. चिखलीकरांना चव्हाणांपेक्षा 40 हजार मतं मिळाली. त्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मतं घेत अशोक चव्हाणांच्या पराभवात निर्णायक भूमिका बजावली.  

( नक्की वाचा : Dharashiv Lok Sabha 2024 : दीर - भावजयीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार? )
 

पुन्हा चव्हाण विरुद्ध चिखलीकर

भाजपानं या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिलीय. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानं काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसनं नगरसेवक ते आमदार असा प्रवास करणाऱ्या वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली. वसंत चव्हाण हे नायगाव विधानसभा मतदारसंघ (पूर्वीचा बिलोली) प्रमुख नेते आहेत. 

ते सुरुवातीला शरद पवारांच्या जवळ होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं 2002 साली त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून ते विजयी झाले. त्यानंतर ते काँग्रेसच्या जवळ गेले. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानं बदललेल्या परिस्थितीत त्यांनी ही निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवली.

( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी? )
 

मतदारसंघातील समीकरण

नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, देगलूर, नायगाव आणि मुखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी भोकरची जागा सध्या अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त आहे. नांदेड दक्षिण आणि देगलूरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. नांदेड उत्तरमध्ये शिवसेना (शिंदे गट) तर नायगाव आणि मुखेड मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. 

मागील लोकसभा निवडणुकीत भोकर, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण हे तीन विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण या तीन मतदारसंघांनी अशोक चव्हाण यांची साथ दिली होती. तर देगलूर, नायगाव आणि मुखेड या मतदारसंघांनी चिखलीकरांच्या बाजूनं कौल दिला होता. यंदा काँग्रेसनं नायगाव आणि परिसरात दबदबा असलेल्या वसंत चव्हाण यांना उमेदवारी देत चिखलीकरांची अडचण वाढवली आहे.ब

नांदेड मतदारसंघात मुस्लीम मतदारांचं प्रमाण मोठं आहे. गेल्यावेळी वंचित आणि एमआयएमची आघाडी होती. त्यामुळे वंचितकडं वळालेली मुस्लीम मतं पुन्हा काँग्रेसला मिळाली तर त्याचाही चव्हाण यांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकवटलेला मराठा समाजानं कुणाला मतदान केलंय त्यावरही निकाल अवलंबून असेल. 

टक्का घसरला फायदा कुणाला?

नांदेड मतदारसंघात 2019 साली 65.69 टक्के मतदान झालं होतं. यंदा जवळवास पाच टक्के कमी म्हणजेच 60.94 टक्के मतदान झालंय. यंदा भोकरमध्ये 65.37, देगलूरमध्ये 59.82, मुखेडमध्ये 56.76, नायगावमध्ये 65.32, नांदेड उत्तरमध्ये 58.13 तर नांदेड दक्षिणमध्ये 60.28 टक्के मतदान झालंय. अटीतटीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरल्यानं कुणाला कौल मिळतो याची उत्सुकता वाढलीय.

चिखलीकर इतिहास करणार का?

नांदेडमध्ये राज्याच्या निर्मितीपासून चारवेळा काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालाय. पण, त्यानंतरच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झालेला नाही. हा इतिहास बदलण्याचं भाजपा आणि चिखलीकर यांच्यापुढं आव्हान आहे. त्यातच अशोक चव्हाण यांचीही त्यांना साथ मिळाली. चव्हाण यांचं पक्षांतर काँग्रेसच्या परंपरागत मतदारांना किती पटलंय हे या निवडणूक निकालात स्पष्ट होईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
फडणवीसां विरोधात मनसे उमेदवार देणार, नाव ही झाले फिक्स
Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला
Eknath Shinde Shiv Sena and Ajit Pawar NCP will get 1 ministerial post each in Modi government
Next Article
मोदी 3.O : शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळणाऱ्या मंत्रिपदाची संख्या ठरली?