प्रतिनिधी, मोसीन शेख
आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. त्या दोघांमध्ये यावेळी संवादही झाला. सुरुवातीला पंकजाताई आल्या तेव्हा त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्या खालीच बसल्या. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी स्थानिकांना पंकजाताईंना देखील खुर्ची द्यावी अशी सूचना केली. त्याबरोबर संयोजकांनी जरांगे पाटील यांच्या शेजारी पंकजाताईंना बसायला खुर्ची दिली. पंकजाताई यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूसही केली.
मागील काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा उभा असलेला लढा व त्यातच महाराष्ट्रासह देशात लागलेली लोकसभेची निवडणूक यामुळे एक वेगळाच तणाव सध्या वातावरणात आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आज संतांच्या ठायी जातीच्या भिंती गळून पडल्याचं पाहायला मिळालं. पंकजा मुंडे यांनी देखील आजपर्यंत कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केलेला नाही किंवा अशा आरक्षण विरोधी कोणत्याही व्यासपीठावर कधीही पंकजा मुंडे गेलेल्या नाहीत. अलीकडच्या काही दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंकजाताई मुंडे किंवा धनंजय मुंडे यांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही, असे स्पष्ट केलेले आहे.
स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी कधीही एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही किंवा याला मत द्या असे आवाहन केलेले नाही. इतकेच नव्हे तर पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांना आम्ही मराठा आरक्षण विरोधी मानत नाही, अशीही जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती.
नक्की वाचा - परभणीचे मतदान आटोपले, जानकरांनी बारामती गाठले, आवाहन काय केले?
अशाही परिस्थितीत काही जणांकडून समाजात दुही माजेल असे वेगळे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्याला आज या दोघांच्या एकत्र येण्याने उत्तर मिळाले असून हा क्षण नक्कीच दोन्ही समाजातील दुही कमी करणारा आणि सुखावणारा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.