'भाजपाला मतदान करण्यासाठी आईवर दबाव', सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

आईला कमळाचं बटन दाबण्यासाठी दबाव टाकला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सु

Advertisement
Read Time: 2 mins
S
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारी सुरु आहे. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान होत आहे. मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात ही लढत होत आहे. या मतदानाच्या दरम्यान आईला कमळाचं बटन दाबण्यासाठी दबाव टाकला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून हा आरोप केलाय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सुषमा अंधारेंची संपूर्ण पोस्ट

'आज बीड लोकसभेचे चौथ्या टप्प्यातले मतदान सुरू आहे माझ्या कुटुंबातील आई भाऊ वहिनी या सगळ्यांचे मतदान परळी तालुक्यातील नंदनज मध्ये आहे.  नंदनज मध्ये आई आज मतदानाला गेली असता प्रवीण रावण गुट्टे हा भाजपकडून असणारा बूथ एजंट याने जोर जबरदस्ती करत कमळाचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला. Pankaja Gopinath Munde  तुमच्याकडून या वागण्याची अपेक्षा मला अजिबात नाही.

स्वतःवर विश्वास असेल तर नैतिकतेने लढा. घडलेला सगळा प्रकार कळल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य मतदान केंद्राकडे गेले मात्र पाच-सहा लोकांनी हे बूथ ताब्यात घेतल्याचे लक्षात आले. गृह खाते आणि निवडणूक आयोगाकडे  तक्रार करून पण ही गुंडागर्दी जर अशीच चालत राहणार असेल तर तुमच्या गुंडागर्दीला आम्ही का मतदान करायचे?  जर तुम्ही विकास कामे केली असतील तुम्ही लोकांमध्ये मिसळला असाल , लोकांना भेटला असाल , लोकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर लोक तुम्हाला मतदान करतील ना लोकशाही प्रक्रियेने निवडणूक होऊ द्या.  पण तुम्ही जर असे अति करणार असाल . जोर जबरदस्ती करणार असाल तर परळीत काय देशात कमळ फुलणार नाही!' 

( नक्की वाचा : 'विखे कुटुंबाचा पैशांचा पाऊस', निलेश लंकेंचे गंभीर आरोप; Video शेअर करून कारवाईची मागणी )

जालनामध्ये काँग्रेसकडून तक्रार

जालना लोकसभा मतदारसंघातही मतदानाच्या दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय.  जालन्यातील डबल जिम परिसरातील मतदान केंद्रावर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याने मतदान मशीनचा क्रम बदलून, मतदान मशीन उलट्या क्रमाने ठेवल्याचा आरोप काँग्रेस  आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. या अधिकाऱ्याने  क्रम बदलून मतदान प्रक्रियेत हेराफेरी केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी काही काळ मतदान प्रक्रिया बंद पडली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी कैलाश गोरंट्याल यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पुन्हा मतदान सुरु झाले. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गोरंट्याल यांनी केली.