निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; विजय करंजकरांचा शिंदे गटात प्रवेश 

लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. विजय करंजकर यांना ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. करंजकर लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या एक दिवस आधी शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाने नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 6 मे आहे. 

नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात होणार मतदान...
विजय करंजकर हे उद्धव ठाकरेंचे जवळचे आणि प्रमाणिक कार्यकर्ते मानले जातात. ते नाशिक लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. दरम्यान करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, मातोश्रीच्या सूचनेनंतर मला नामांकन मिळालं नव्हतं. यानंतर 3 मे रोजी विजय करंजकर यांनी बंड पुकारलं आणि अपक्ष उमेदवारी दाखल केला. करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणं महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात होता. 

नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 7 मे रोजी होणार आहे. उद्या मंगळवारी बारामती, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर या मतदारसंघासाठी उद्या मंगळवार 7 मे रोजी मतदान होणार आहे. 

Advertisement

नक्की वाचा - 'विश्वजीत कदम वाघच,संधी बघून वाघ झडप घालतो'

ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी...
नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर आग्रही होते. मात्र ऐनवेळी ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि विजय करंजकर नाराज झाले होते.  मी आता नडणार आणि लढणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती.