प्रतिनिधी, मनोज सातवी
भाजपने पालघर लोकसभा मतदारसंघातून डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे राजेंद्र गावितांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
महायुतीच्या बैठकीत विद्यमान खासदारांना तिकीट देण्याबाबत निर्णय झाला होता. पालघर मतदारसंघ शिवसेना किंवा भाजपला गेला तरीही तिकीट राजेंद्र गावित यांनाच मिळेल असं ठरलं होतं. मात्र ऐनवेळी मला तिकीट नाकारण्यात आल्याचा गौप्यस्फोट खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. यासंदर्भात NDTV मराठीचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी राजेंद्र गावित यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ऐनवेळी मला तिकीट नाकारलं हे माझ्यासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. मला तिकीट नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून माझ्या विरोधात आठ ते दहा प्रमुख पुढारी होते. भाजप आणि शिवसेनेतील ठराविक लोकांकडून माझ्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. परंतु नाराजी दूर करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन करणार असल्याचं गावित यावेळी म्हणाले.
का नाकारलं तिकीट?
बहुजन विकास आघाडीकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी न देण्याची अट भाजप ठेवण्यात आली होती. बहुजन विकास आघाडीला मी वसई विरार मनपा क्षेत्रात काम करत असल्याचा राग होता. भाजप विरोधात आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन बविआ दुय्यम दर्जाचा उमेदवार देणार होते. सशक्त उमेदवारा ऐवजी हाता खाली काम करणाऱ्या कमजोर उमेदवारासाठी बविआचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. बहुजन विकास आघाडीला सांगकाम्या उमेदवार पाहिजे होता त्याच्यात ते यशस्वी झाले.
नक्की वाचा - राणेंसाठी अमित शहा मैदानात, कोकणात ठाकरे बंधुंच्या सभांचाही तडका
विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आपली उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असली तरी देखील माहितीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र याचवेळी त्यांनी भाजपा आणि बहुजन विकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.