रामराजे शिंदे
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठीचं मतदान झालं आहे. यंदा मतदान प्रक्रियेत मतदारांनी हिरीरीने सहभाग घेतला. त्यामुळे मतदानाची टक्केवारीही चांगलीच वाढली. या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार हे आपण पाहूयात. एसआयआरच्या गदारोळानंतर बिहारची पहिलीच निवडणूक घेण्यात येत आहे. एसआयआर वरून राहुल गांधी यांच्यासह तेजस्वी यादव यांनी सभा घेतल्या आणि रॅली काढल्या. वातावरण तापलं असतानाच बिहार निवडणूक आली.
यंदा बिहार विधानसभा 121 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 64.66% मतदान झाले. मागील निवडणूकीत पहिल्या टप्प्यात फक्त 55.68% मतदान झाले होते. म्हणजेच मागील निवडणूकी पेक्षा यंदा मतांची टक्केवारी साडेआठ टक्के जास्त राहीली आहे. मतदानांची टक्केवारी वाढण्यामागची कारणं काय आहेत तेही आपण पाहूयात. त्या प्रमुख कारण महिलांबाबत एनडीए आणि इंडिया अलायन्स कडून योजना घोषित केल्या गेल्या. नितीश कुमार यांनी प्रत्येक महिलांच्या खात्यात 10 हजार रूपये तर तेजस्वी यादव यांनी प्रत्येक महिलेच्या खात्यात 30 हजार रूपये देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महिला मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले.
या शिवाय एसआयआरमध्ये मतचोरीचा मुद्दा मांडला गेला होता. त्यामुळे मागास आणि अतिमागास समाज मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यास बाहेर पडला. प्रशांत किशोर यांच्यामुळे तरूण मतदारांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रशांत किशोर यांनी सर्वात आधी प्रचार मोहीम हाती घेतली. बिहारमध्ये रॅली केल्यामुळे तरूणाईत प्रशांत किशोर यांचे नाव पोहोचले. मतदान टक्केवारी वाढीचं ते एक कारण आहे. त्याच बरोबर छठ उत्सवमध्ये परराज्यात राहणारे बिहारी मतदार गावी आले. छठ नंतर लगेच निवडणूक असल्यामुळे त्यांनाही यात भाग घेतला. त्यामुळेही मतदानाचा टक्का वाढल्याचं बोललं जात आहे.
नक्की वाचा - Two wheeler Toll: दुचाकीला टोल का द्यावा लागत नाही? 99 टक्के लोकांना कारणच माहित नाही
स्वातंत्र्यानंतर झालेल्या 17 विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर नजर टाकली तर कळेल की जेव्हा जेव्हा बिहारमध्ये 5% पेक्षा जास्त मतदान वाढले तेव्हा सत्ता बदलल्याचा इतिहास आहे. जेंव्हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान वाढले त्यावेळी काय झाले ते ही जाणून घेवू. 1962 ला 44.5 टक्के मतदान झाले होते. परंतु पुढे 1967 मध्ये 51.5 टक्के मतदान झाले होते. यावेळी 7 टक्के मतदान वाढले आणि सत्ता परिवर्तन झाले. काँग्रेस सत्तेतून पायउतार झाली आणि जन क्रांती दल सत्तेत आलं. महामाया प्रसाद सिन्हा मुख्यमंत्री बनले. 1980 ला 57.3 टक्के मतदान झाले. त्यापूर्वी निवडणूकीत 1977 ला 50.5 टक्के मतदान झाले होते. म्हणजे 6.8 टक्के मतदान वाढले. यावेळीही सरकार बदलले.
या वेळी काँग्रेसचे सरकार आले आणि जगन्नाथ मिश्र मुख्यमंत्री बनले. 1985 ला 56.3 टक्के मतदान झाले. 1990 ला 62 टक्के मतदान झाले. यावेळेस 5.9 टक्के मतदान वाढले. काँग्रेसचे सरकार गेले, जनता दलाचे सरकार आले आणि लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री झाले. या आकडेवारी वरून हे लक्षात येते की पहिल्या टप्प्यात जशी मतांची आकडेवारी वाढली तशीच शेवटच्या टप्प्यात मतदान वाढली, तर ते बिहारचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलू शकते. शिवाय महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. त्यामुळे महिलांचे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार यावरून सत्ता कोणाची येतेय हे स्पष्ट होईल.