बिहार विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाने आपली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या शिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा यांचा समावेश स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत महाराष्ट्रातल्या नेत्यांना ही संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातले तीन नेते या यादीत आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्राच्या नेत्यांना ही स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तीन नेते बिहारमध्ये पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून प्रचार करतील. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे सरचिटणिस विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिवाय भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री ही स्टार प्रचारक म्हणून बिहारमध्ये निवडणुकीत प्रचार करणार आहेत.
या शिवाय अभिनेता दिनेशलाल यादव म्हणजेच निरहूआ यांचाही स्टार प्रचारक म्हणून समावेश करण्यात आला आहे. पवनसिंह, रवी किशन आणि मनोज तिवारी हे बिहारमध्ये लोकप्रिय असलेल्या कलाकार नेत्यांनाही या यादीत स्थान मिळालं आहे. जवळपास चाळीस जणांची ही यादी आहे. निवडणूक आयोगाला ही यादी देण्यात आली आहे. बिहार विधानसभेचा धुरळा उडणार आहे. चाळीच जणांवर प्रचाराची जबाबदारी असली तरी भाजपचा प्रमुख चेहरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असणार आहेत.