- ठाकरे बंधू आणि महायुती यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जवळपास समान आश्वासनांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत
- ठाकरे बंधूंनी महिलांसाठी १०० टक्के मोफत प्रवास आणि महायुतीने ५० टक्के सवलत यांसह विविध लाभ दिले आहेत
- दोन्ही पक्षांनी BEST बसेसच्या सेवांमध्ये सुधारणा आणि तिकीट दर कमी ठेवण्याचे आश्वासन दिले आहे
ठाकरे बंधूंपाठोपाठ महायुतीचाही मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. ठाकरे बंधू-महायुतीच्या जाहीरनाम्यात जवळपास 9 मुद्दे सारखेच असल्याचं समोर आलं आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी 4 जानेवारीला वचननामा जाहीर केला. तर मतदानाला बरोबर चार दिवस असताना महायुतीने आपला जाहीरनामा जाहीर केला. दोन्ही जाहीरनाम्यात एक गोष्ट सेम आहे, ती म्हणजे आश्वासनाची खैरात. दोन्ही बाजूंनी मुंबई जिंकण्यासाठी आश्वासनांची खैरात वाटली आहे हे आता स्पष्ट झालं आहे. या शिवाय ठाकरे बंधू आणि महायुती जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील 9 मुद्दे हे सारखेच आहेत
ठाकरे बंधूंनी आपल्या जाहीरनाम्यात महिलांनासाठी अनेक अश्वासनं दिली आहेत. त्यात महिलांना 100% मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. मग महायुती कुठे मागे राहणार होती. त्यांनी ही महिलांना 50% सवलतीची घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंचे दुसरे आश्वासन हे BEST तिकीट दराचे आहे. त्यांनी ₹5–₹20 दरम्यान हे तिकीट दर स्थिर ठेवणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तर महायुतीने BEST च्या बसेसची संख्या 5,000 ते 10,000 ने वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे. शिवाय मल्टी-मोडल तिकीट योजना राबवण्याचं म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजने प्रमाणे घरकाम करणाऱ्या महिलांना ₹1500 प्रतिमहिना देण्याचं आश्वासन ठाकरे बंधूंनी आपल्या वचननाम्यात दिलं आहे. तर महायुतीने महिलांना ₹5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे. ठाकरे बंधू स्वयंरोजगाराचं ही आश्वासन देतात. ₹25,000 ते ₹1 लाख स्वयंरोजगार सहाय्यता निधी देण्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर महायुतीने महिला बचत गटांना 30 हजार रुपये देणार असल्याचं आश्वासन मुंबईतल्या महिलांना दिलं आहे. ठाकरेंच्या वचननाम्यात 700 चौरस फूटांपर्यंतच्या घरांना पूर्ण कर माफी देण्यात आली आहे. तर महायुतीने पाणीपट्टी वाढ 5 वर्षांसाठी स्थगित करण्याचं ठरवलं आहे.
ठाकरे बंधू BPT च्या 1800 एकर जमिनीवर विकास आणि मुंबईसाठी गिफ्ट सिटीसदृश प्रकल्प उभारणार आहेत. तर महायुतीने झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि धारावी पुनर्विकास याचा वादा केला आहे. BMC शाळांमध्ये Junior College काढणार असल्याचं ठाकरे बंधूंनी मुंबईकरांना सांगितलं आहे. तर महायुतीने बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ, शैक्षणिक विस्तार करणार असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचं ही ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तर तरुणांसाठी विशेष क्रीडा व सांस्कृतिक पायाभूत योजना देणार असल्याचं महायुतीने सांगितलं आहे.
मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅनचं ठाकरेंनी वादा केला आहे. तर प्रदूषणमुक्त मुंबई, 2029 पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक करणार असल्याचं महायुतीने सांगितलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दोघांकडून वचननाम्यातून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. तर उद्धव ठाकरेंना देखील फडणवीसांनी वचननामा प्रसिद्ध करत असताना चिमटा काढला आहे. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावत विकास दाखवा आणि एक लाख मिळवा असं म्हटलं होतं. त्यावर आज फडणवीस म्हणाले की ठाकरेंना सांगा की लगेच 1 लाख पाठवा. दोघांच्या जाहीरनाम्यात महिला वर्गावर मोठा फोकस दिसून येतोय. विधानसभा निवडणुकीत जशी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, तसंच कोणाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर महिला मुंबई पालिकेची सत्ता देणार हे 16 जानेवारीलाच समजेल.