BMC Election 2026 : मानखुर्दमध्ये राडा; भाजपा नेत्यांनी रात्री बोलावलं आणि...अपक्ष उमेदवाराचा सनसनाटी आरोप

BMC Election 2026 : प्रभाग क्रमांक 135 मधील निवडणूक आता वैयक्तिक आरोपांमुळे चांगलीच तापली असून भाजपा आणि अपक्ष उमेदवार आमनेसामने आले आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins
BMC Election 2026 : मानखुर्दच्या राजकीय रणधुमाळीत सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई:

सागर जोशी, प्रतिनिधी

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेचा प्रचार आता रंगात आलाय. प्रत्येक पक्षासाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यातचं मानखुर्दच्या राजकीय रणधुमाळीत सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 135 मधील निवडणूक आता वैयक्तिक आरोपांमुळे चांगलीच तापली असून भाजपा आणि अपक्ष उमेदवार आमनेसामने आले आहेत. 

भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्या विरोधात अपक्ष नशीब आजमावणारे लालूभाई वर्मा यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी आपल्यावर प्रचंड दबाव टाकला जात असून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा लालूभाईंनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपा उमेदवार नवनाथ बन हे प्रचारादरम्यान लालूभाई वर्मा यांच्या कार्यालयात पोहोचले, त्यावेळी हे प्रकरण अधिक गंभीर झाले. बन यांच्यासमोरच लालूभाई आक्रमक झाले आणि त्यांनी भाजप नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठा तणाव पाहायला मिळाला. लालूभाईंची आक्रमकता पाहून अखेर नवनाथ बन यांनी नमती भूमिका घेतली. तुम्ही तुमचा प्रचार करा, आम्ही आमचा प्रचार करतो, असे म्हणत हात जोडून तिथून निघून जाणेच बन यांनी पसंत केले.

( नक्की वाचा : BMC Election 2026 : मुंबईचा महापौर कोण? नव्या सर्व्हेने वाढवलं सर्वांचं टेन्शन; 'हे' मतदार ठरणार निर्णायक )

बड्या नेत्यांचा दबाव असल्याचा दावा

लालूभाई वर्मा यांनी केवळ स्थानिक नेत्यांवरच नाही, तर भाजपच्या मोठ्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या, मनोज कोटक आणि अमित साटम यांनी आपल्याला रात्री उशिरा बोलावून घेतले होते, असा दावा त्यांनी केला आहे. 

Advertisement

उमेदवारी मागे न घेतल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि प्रसंगी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हे सर्व मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. पोलिसांमार्फत आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

प्रभाग 135 मध्ये चुरशीची लढत

मानखुर्दच्या या प्रभागात लालूभाई वर्मा यांची ताकद मोठी मानली जाते. 2027 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून लढताना दुसरे स्थान मिळवले होते. त्यामुळेच भाजपसाठी हे आव्हान कठीण ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे नवनाथ बन आणि अपक्ष लालूभाई वर्मा यांच्यात आता थेट लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपने या जागेसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली असली, तरी लालूभाईंच्या या आरोपांमुळे निवडणुकीत नवे वळण आले आहे.

Advertisement

लालूभाई वर्मा यांनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या आरोपांबाबत अद्याप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा नवनाथ बन यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 16 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये या वादाचा काय परिणाम होतो आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपची संघटनात्मक ताकद आणि लालूभाईंचे वैयक्तिक वलय यांच्यातील हा सामना आता अटीतटीचा झाला आहे.
 

Topics mentioned in this article