जाहिरात

BMC Election 2026 : मुंबईचा महापौर कोण? नव्या सर्व्हेने वाढवलं सर्वांचं टेन्शन; 'हे' मतदार ठरणार निर्णायक

BMC Election 2026 : मुंबईकरांचा कौल नेमका कोणाकडे आहे, याबाबतचा एक नवा सर्व्हे समोर आला असून या आकडेवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. 

BMC Election 2026 : मुंबईचा महापौर कोण? नव्या सर्व्हेने वाढवलं सर्वांचं टेन्शन; 'हे' मतदार ठरणार निर्णायक
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नवा सर्व्हे समोर आला आहे.
मुंबई:

BMC Election 2026 :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा कौल नेमका कोणाकडे आहे, याबाबतचा एक नवा सर्व्हे समोर आला असून या आकडेवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. 

मुंबईचा महापौर मराठीच होणार असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू आणि मराठीच होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. याच वादात आता अमराठी आणि मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

काय आहे सर्वेक्षण?

AsceIndia या संस्थेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सविस्तर सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार कोणत्या पक्षाला कोणत्या समाजाची किती टक्के मते मिळतील, याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अहवालानुसार यंदाही मुंबईत 2017 प्रमाणेच 55 टक्क्यांच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबईतील जवळपास निम्मे मराठी मतदार हे ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. तरीही मुंबईत भाजप आणि शिवसेनेची (शिंदे गट) सत्ता येईल आणि त्यांचाच महापौर होईल, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.


( नक्की वाचा : BMC Election 2026 : काँग्रेसचा 'गेम' फिरला, 'या' 16 प्रभागांत बंडखोरांनाच रसद देण्याची वेळ ! वाचा सविस्तर )

मराठी मतदार कुणाच्या बाजूनं?

मराठी मतदारांच्या कौलाचा विचार केल्यास, भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला 42 टक्के मराठी मते मिळतील, असा अंदाज आहे. तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीला 44 टक्के मराठी मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 4 टक्के आणि इतरांना 11 टक्के मराठी मते मिळतील. या आकडेवारीवरून मुंबईत मराठी मतांसाठी ठाकरे बंधू आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

यावर भाजप नेत्या शायना एन सी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, विरोधक फक्त बोलण्याचे काम करतात, मात्र आम्ही प्रत्यक्षात काम करतो आणि जनता कामालाच मत देते.

अमराठी मतदार काय करणार?

अमराठी मतदारांची भूमिका या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. सर्व्हेनुसार, तब्बल 53 टक्के अमराठी मतदार भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने आहेत. त्या तुलनेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला केवळ 15 टक्के अमराठी मते मिळतील असा अंदाज आहे.

काँग्रेसला 19 टक्के आणि इतरांना 13 टक्के अमराठी मते मिळू शकतात. भाजपला मिळणारा हा मोठा अमराठी पाठिंबा निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

( नक्की वाचा : KDMC Election: 'पैसे घेऊन पळकुट्या लोकांना उमेदवारी दिली', ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखावर उमेदवाराचाच खळबळजनक आरोप )

मुस्लीम मतदार कुणाच्या बाजूनं?

मुस्लrम मतदारांच्या कलानुसार, काँग्रेसला सर्वाधिक 41 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीला 28 टक्के मुस्लिम मते मिळू शकतात, तर भाजप-शिवसेना महायुतीला 11 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर, मराठी मते ठाकरे बंधूंकडे, अमराठी मते भाजप-शिवसेनेकडे आणि मुस्लिम मते काँग्रेसकडे विभागली गेल्याचे पाहायला मिळत आहे. आता या मराठी विरुद्ध अमराठी लढाईत प्रत्यक्षात मतदार कोणाला कौल देतात, हे 16 तारखेलाच स्पष्ट होईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com