लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील 8 मतदार संघांचा आणि देशातील 89 मतदार संघासाठीच्या प्रचार आजचा ( बुधवार) शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी हा प्रचार थांबेल. त्यानंतर प्रचारासाठी वैयक्तिक गाठीभेटीवर अधिक भर राहील. प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी बड्या नेत्यांच्या सभा राज्यात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अमरावतीत सभा घेणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. शिवाय उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोले यांच्याही सभा होणार आहेत.
हेही वाचा - दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेच्या वाट्याला? यामिनी यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
किती मतदार संघाचा प्रचार थांबणार
राज्यातील 8 मतदार संघात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यात अमरावती, वर्धा, परभणी, बुलडाणा, वाशिम यवतमाळ, हिंगोली, नांदेड, अकोला या मतदार संघाचा समावेश आहे. या सर्व मतदार संघामध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रामुख्याने या मतदार संघात मैदानात आहेत. दरम्यान देशातल्या 89 मतदार संघात ही आज प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे.
राहुल गांधी अमित शहांच्या सभा
आजचा दिवस दिग्गजांच्या सभांनी गाजणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार आहेत. तर राहुल गांधीही अमरावती काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी सभा घेतली. त्यानंतर ते सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंसाठी सभा घेणार आहेत. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सभांचा धडाका लावणार आहेत. शिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही मैदानात असतील. त्यामुळे दिग्गजांच्या प्रचाराने आजचा दिवस ढवळून निघणार आहे.
शुक्रवारी होणार मतदान
या आठ मतदार संघातील प्रचार आज संध्याकाळी थांबेल. शुक्रवारी 26 एप्रिलला या मतदार संघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी पुर्व विदर्भातल्या 5 लोकसभा मतदार संघात 19 एप्रिलला मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात तुलनेने कमी मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राजकीय पक्षां बरोबरच निवडणूक आयोगाचीही कस लागणार आहे.