लोकसभा निवडणुकीत भाजपला पुर्ण बहुमतापासून रोखण्यात काँग्रेसला यश मिळाले. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत लोकसभेच्या 99 जागांवर विजय मिळवला. तर इंडिया आघाडी 232 जागा जिंकली. या निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपचा 400 पारचा नारा नाराच राहीला. एकीकडे भाजप अनेक राज्यात पराभवाचा फटका कसा बसला याचे चिंतन करण्यात मग्न आहे. अशा वेळी काँग्रेसने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी दिल्लीत बैठकांचे आयोजन केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'या' राज्यांवर काँग्रेसचे लक्ष
आगामी काळात महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांनी काँग्रेसला साथ दिली. इंडिया आघाडीने इथे मुसंडी मारली. तर झारखंडमधील यश ही ठसठशीत दिसले. मात्र जम्मू काश्मीर मधली कामगिरी तेवढी समाधानकारक नव्हती. महाराष्ट्रा इंडिया आघाडीने 31 जागा जिंकल्या. त्यात सर्वाधिक 13 जागा या काँग्रेसला मिळाल्या. शिवाय एका ठिकाणी काँग्रेस बंडखोर उमेदवार जिंकून आला. त्यामुळे महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. त्या दृष्टीने 24, 25, 26 आणि 27 जून रोजी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात काँग्रेसच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांना हजर राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल गांधींचा नकार, आता 'ही' 3 नावे चर्चेत
बैठकीला कोणाची उपस्थिती?
ही बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के. सी. वेणूगोपाल उपस्थित राहणार आहेत. तर राज्यातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील रणनितीवर चर्चा होईल. लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा या काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे विधानसभेत जागा वाटपात काँग्रेस आक्रमक असेल. त्या दृष्टीने रणनिती ठरवली जाईल. काँग्रेसने 100 पेक्षा जास्त जागा पदरात पाडण्याची तयारी सुरू केली आहे. शिवाय 288 मतदार संघाचा आढावाही घेतला आहे.
ट्रेंडिंग बातमी - मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकार अॅक्शन मोडवर, घेणार मोठा निर्णय?
हरियाणा आणि झारखंडचीही रणनिती ठरणार
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातून काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळचे चित्र मात्र वेगळे होते. काँग्रेसने इथेही जोरदार मुसंडी मारत दहा पैकी पाच जागा जिंकल्या आहेत. शिवाय राज्यातले भाजपचे सैनी सरकार ही अडचणीत आहे. ते अल्पमतात असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. हे सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी काँग्रेसची मागणी आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रा बरोबरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. इथे काँग्रेसला संधी आहे. त्यामुळे काँग्रेसने आतापासूनच इथे लक्ष केंद्रीत केले आहे. तर झारखंडमध्येही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे इथेही इंडिया आघाडीला संधी आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कामाला लागली आहे.