विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तब्बल 65.11 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का मागिल निवडणुकी पेक्षा यावेळी वाढला आहे. त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्थ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात मतदानानंतर एक्झिट पोलही समोर आले आहेत. त्यानुसार महायुतीला सत्ता स्थापनेची संधी आहे. तर महाविकास आघाडी जोरदार टक्कर देत असल्याचे समोर आले आहे. काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ असल्याचे दाखवले आहे. सट्टाबाजारानेही महायुतीलाच कौल दिला आहे. अशा वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसला किती जागा मिळतील हेच सांगून टाकले आहे. शिवाय सरकार कोणाचे येणार हे ही सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदान झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नांदेड जिल्ह्यातील माहूर इथं रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला जवळपास 75 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला. शिवाय महाविकास आघाडीचेच सरकार राज्यात येईल असंही ते म्हणाले. एक्झिट पोल काय दाखवता त्या पेक्षा वास्तव काय आहे हे महत्वाचे असल्याचे नाना पटोले म्हणाले.महाविकास आघाडी पुर्ण बहुमतासह सरकार बनवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - सट्टाबाजारात आघाडी की महायुती? एक्झिट पोलनंतर सट्टाबाजाराचा अंदाज काय?
काँग्रेसने विधानसभेच्या जवळपास 101 जागा लढवल्या आहेत. त्या पैकी 75 जागा काँग्रेस जिंकेल असा ही दावा आता नाना पटोले यांनी केला आहे. एक्झिट पोल नुसार राज्यात सत्ता स्थापनेची संधी ही महायुतीला असल्याचे सांगितले जात आहे. पण काही पोल्स मात्र महाविकास आघाडीला ही कौल देत आहे. शिवाय युती आणि आघाडी मध्ये काँटे की टक्कर असल्याचेही दिसून येत आहे. त्यात मतदानाचा टक्काही वाढला आहे. त्यामुळे हा वाढलेला टक्काही महत्वाचा ठरणार आहे. हे वाढलेलं मतदान सत्ते विरोधात की सत्तेसाठी आहे यावर सर्व काही अवलंबून असणार आहे.
गेल्या काही निवडणुकांतील एक्झिट पोल हे चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे यावेळी ही हे पोल्स किती ठरतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तशीच शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी महायुतीचे सरकार येईल असा विश्वासच व्यक्त केला आहे. त्यामुळे 23 तारखेची वाट सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारही पाहात आहेत. प्रत्येकानेच आपल्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे.