Delhi Election Result 2025 , PM Modi Speech : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे. दिल्लीत 1998 नंतर तब्बल 27 वर्षांनी भाजपाला सत्ता मिळाली आहे. या विजयानंतर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. तसंच यापूर्वी दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की दिल्लीकरांनी भाजपाला सेवेचे संधी दिली आहे. दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करण्याची संधी दिली आहे. मी दिल्लीकरांना नमन करतो. मी दिल्लीकरांचे आभार मानतो. आज अहंकार, दिखाऊपणा आणि उद्धटपणाचा पराभव झाला आहे. सर्व भाजपा कार्यकर्त्यांना या विजयाचे श्रेय आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचं विजयाबद्दल अभिनंदन करतो. आज दिल्लीच्या जनतेने स्पष्ट केले आहे की दिल्लीचे खरे मालक दिल्लीची जनता आहे.
दिल्लीचे मालक असल्याचा गर्व होता त्यांना अखेर सत्याला सामोरे जावे लागले आहे. राजकारणात शॉर्टकट आणि खोटेपणाला थारा नसतो हे दिल्लीच्या निकालाने दाखवून दिले. शॉर्टकट घेणाऱ्या लोकांचे दिल्लीकरांनी शॉर्टसर्किट केले, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
( नक्की वाचा :Delhi Election Results 2025 : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'या' नावांची सर्वाधिक चर्चा )
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भाजपाच्या डबल इंजिन सरकारवर देशाचा किती विश्वास आहे, हे आजच्या निकालानं स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर आम्ही सुरुवातील हरियाणामध्ये अभुतपूर्व रेकॉर्ड केला. त्यांनंतर महाराष्ट्रात केला. आता दिल्लीत नवा इतिहास रचला. दिल्लीकर भाजपाचा विज. आणि 'आप-दा' पासून सुटका झाल्याचा जल्लोष करत आहेत. दिल्लीकरांना 'सबका साथ, सबका विश्वास, पूरी दिल्ली का विकास' ही माझी गॅरंटी आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
आज प्रत्येक वर्गानं भाजपाला मतदान केलं आहे. आज देशाला तृष्टीकरण नाही तर भाजपाच्या संतृष्टीकरणावर विश्वास आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.