अझरुद्दीन शेख, प्रतिनिधी
Dharashiv Osmanabad lok sabha Election 2024 : धाराशिव जिल्ह्यातल्या पाठसांगवीमध्ये मतदानाच्या दरम्यान एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघड झाली होती. समाधान पाटील असं या तरुणाचं नाव आहे. समाधानची हत्या ही राजकीय कारणामुळे नाही तर वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याची माहिती आता समोर येत आहे. धाराशिवचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही माहिती दिलीय. समाधान पाटीलची हत्या प्रेमप्रकरणाच्या वादातून झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. या प्रकरणात कोणतेही राजकीय कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय होतं प्रकरण?
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी मतदान केंद्रावर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे गटाचे कार्यकर्ते मतदारांना घेऊन आले होते. काही कारणास्तव दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली होती. यावेळी झालेल्या चाकू हल्ल्यात ठाकरे गटाच्या समाधान पाटीलची हत्या झाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती, पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात राजकीय वाद नसल्याचं स्पष्ट केलंय.
दरम्यान, समाधन पाटील हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी धाराशिवमधील ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केलीय. 'NDTV मराठी' शी बोलताना त्यांनी ही मागणी केली. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धाराशिव मतदारसंघात 52.78 टक्के मतदान झालं आहे.
( नक्की वाचा : Video : मतदार असावा तर असा! दोन्ही हात नाहीत तरी तरुणानं पायानं केलं मतदान )
हातकणंगलेमध्ये हाणामारी
हातकणंगले मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर हा प्रकार घडला. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली.
मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते. यावरून सत्यजित पाटील सरूडकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जाब विचारण्या करीता आले असता दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली.