ओंकार कुलकर्णी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची 'महायुती' अधिकृतपणे जाहीर झाली आहे. मात्र, कागदावर असलेली ही युती प्रत्यक्ष मैदानात आपसात संघर्ष करताना दिसते आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस असताना, महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
नक्की वाचा: शिंदेंची शिवसेना भाजपच्या आमदाराने केली हायजॅक? ‘ऑडिओ बॉम्ब' ने खळबळ
जागावाटपाचा तिढा आणि भाजपची खेळी
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये धाराशिव जिल्हा परिषदेच्या एकूण 55 जागांपैकी 23 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक जागांवर भाजपने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विशेषतः राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परांडा विधानसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला आहे. येथील शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या 13 पैकी 13 जागांवर भाजपने समांतर उमेदवार उभे केल्याने, ही निवडणूक 'महायुती विरुद्ध महाविकास आघाडी' नसून 'भाजप विरुद्ध शिवसेना' अशीच होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
'पेपर फोडणार नाही' – आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा सस्पेन्स
या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी "आम्ही आताच पेपर फोडणार नाही," असे सूचक वक्तव्य करत सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप आपले उमेदवार मागे घेणार की 'फ्रेंडली फाईट'च्या नावाखाली स्वतंत्र ताकद दाखवणार, याबाबत संभ्रम वाढला आहे.
जुन्या जखमा ताज्या झाल्या
यापूर्वी धाराशिव नगर परिषद निवडणुकीतही अशाच प्रकारच्या अंतर्गत वादामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा राजकीय फटका बसला होता. त्या अनुभवाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद निवडणुकीत होऊ नये, असे मत शिवसैनिक व्यक्त करत आहे. दुसरीकडे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आजचा दिवस निर्णायक
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत महायुती एकजुटीने लढणार का भाजप आणि शिवसेना एकमेकांच्याविरोधात उभे ठाकणार हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. यामुळे आजचा दिवस या दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून, महायुतीमधील दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे.