उद्धव ठाकरेंना 'ती' पत्रकार परिषद भोवली, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

Election Commission on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झालीय. ठाकरे यांच्यावर कारवाईचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरु असताना ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात  राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबत आयोगाकडं तक्रार केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले होते ठाकरे ?

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरु असताना ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी  निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतोय का? असा प्रश्न विचारला होता.  निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

माझं नागरिकांना आवाहन आहे, त्यांनी पुन्हा मतदार केंद्रांवर जा. मतदान करा मगच बाहेर पडा. पहाटेचे 5 वाजले तरी बाहेर पडू नका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. भाजप पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करत आहे. मतदान करतेवेळी दिरंगाई केली जात आहे. थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नका. मतदान केंद्रात जाऊन उभे राहा. मतदान केंद्रात जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत, त्यांना कितीही वाजले तरी सोडू नका, असं ठाकरे यांनी सांगितलं होतं.

( Maharashtra Exit Polls : NDA ची वाटचाल महाराष्ट्रात अडखळणार? दोन्ही आघाड्यांमध्ये काँटे की टक्कर )
 

भाजपाकडून पलटवार

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. 
 

Advertisement