गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून 'राम मंदिर' या मुद्द्यावरुन राजकारण केलं जात आहे. यंदाच्या निवडणुकीतही भाजपने अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मतं खेचण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. लोकांच्या मनात असलेला राम ठिकठिकाणी दिसू लागला. 'जय श्री राम'च्या घोषणा गल्लोगल्ली ऐकू येऊ लागल्या. कोणताही कार्यक्रम असला तरी राम दूर राहिला नाही. अगदी घराबाहेर लावलेल्या पताक्यांपासून ते गाड्यांच्या स्टिकरवर धनुष्यबाण हातात घेतलेला राम ठसठशीत दिसत होता. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी घाईघाईत राम मंदिराचं लोकर्पणही केलं. मात्र राममंदिराचा मोठा सोहळा करूनही प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपला मुळीच यश मिळू शकलेलं नाही. खुद्द अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबादमध्येच भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.
फैजाबादमध्ये भाजपचे 2 वेळा खासदार असलेल्या लालू सिंगांचा पराभव झाला तर समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद जवळपास 55 हजार मतांनी विजयी झाले. फैजाबादमधल्या पाच विधानसभा मतदारसंघात सपाला सर्वाधिक मतं मिळाली. अयोध्येत 'जिसनं राम को लाए है, हम उसको लाएँगे' अशी भाजपची घोषणा होती. तर ना मथुरा, ना काशी, अब की बार अवधेश पासी, अशी सपाची घोषणा होती. अखिलेश यादवांनी अयोध्येत PDA म्हणजेच अतिमागास, दलित आणि अल्पसंख्याक कार्ड खेळलं, त्यात सपा यशस्वी झाली. अयोध्येत मंदिरासाठी जमीन दिली त्यांना मोबदला मिळाला नसल्याचीही तक्रार होती.
फैजाबादच नव्हे तर तिथून शंभर किलोमीटरवर असलेल्या श्रावस्ती लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. योगायोग असा की राममंदिराच्या निर्मितीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्या नृपेंद्र मिश्रांचा मुलगा साकेत मिश्रा श्रावस्तीमधून रिंगणात होता. त्याचाही पराभव झाला. अयोध्याच नव्हे तर भाजपनं जिथे जिथे रामाच्या नावावर मतं मागितली, तिथे तिथे भाजपचा पराभव झाला. नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली होती. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी झाले. त्यांनी भाजपचे सहकारी शिवसेनेचे हेमंत गोडसेंचा दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
नक्की वाचा - BJP स्पष्ट बहुमतापासून दूर, PM मोदींना करावा लागणार 5 मोठ्या आव्हानांचा सामना
चित्रकूटचा समावेश असलेल्या बांदा लोकसभा मतदारसंघातही सपाचा उमेदवार विजयी झाला. भाजपचे आर के सिंग पटेल 70 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले. रामटेकमधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी भाजपचे सहकारी शिवसेनेच्या राजू पारवेंचा 76 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. सर्किटमध्येच नव्हे तर देशातही भाजपला राममंदिराचा फायदा झालेला नाही.
25 सप्टेंबर 1990 ला राममंदिरासाठी लालकृष्ण आडवाणींची निघालेली रथयात्रा ते 22 जानेवारी 2024 ला मोदींनी अयोध्येत केलेली प्राणप्रतिष्ठा, भाजपचा रामाबरोबरचा हा राजकारणाचा प्रवास होता. नुसता प्रवास नव्हे तर भाजपनं राममंदिराच्या मुद्द्यासह भारतीय राजकारणाचा बाजच बदलून टाकला होता. आता ज्यावेळी संकल्प पूर्ण झाला, त्यावेळी खुद्द अयोध्येत कमळ फुललंच नाही. भारतीय राजकारणच पुन्हा नव्या वळणावर जाणार का, त्याचेच हे संकेत असावेत.