महायुतीत अजूनही काही जागांवरू वाद आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्या पैकी एक जागा म्हणजे नाशिक लोकसभेची. या मतदार संघासाठी अजित पवार आग्रही आहेत. शिवाय इथं भाजपनंही दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे. या मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर हेंमत गोडसे यांनी २०१९ ला बाजी मारली होती. मात्र असलं तरी अजूनही त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे गोडसें समोर वेट अँड वॉच शिवाय पर्याय राहीलेला नाही.
अजित पवार नाशिकसाठी आग्रही का?
नाशिक लोकसभेत सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहे. तसा हा मतदार संघ शिंदे गटाच्या पारड्यात जायला हवा होता. मात्र असं असलं तरी इथल्या उमेदवाराची घोषणा होवू शकलेली नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे छगन भुजबळ. या मतदार संघातून छगन भुजबळ निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. भुजबळांसाठी ही जागा सुटावी म्हणून अजित पवार प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढवणार की शिवसेना इथं पेच फसला आहे. २०१४ ला छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक नाशिक मधून लढवली होती. पण मोदी लाटेत त्यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता. अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या भुजबळांना आता दिल्लीचे वेध लागले आहेत. त्यासाठी अजित पवारांनी ही जागा मिळवण्यासाठी संपुर्ण ताकद लावली आहे.
भाजपची भूमिका नेमकी काय?
नाशिक लोकसभेतील तीन विधानसभा मतदार संघामध्ये भाजपचे आमदार आहेत. भाजपची ताकद मतदार संघात वाढल्यामुळे नाशिक लोकसभा भाजपनं लढवावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी आहे. नाशिकमध्ये भाजप नेते दिनकर पाटील यांनी तयारीही सुरू केली होती. त्यातच नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी नाशिक मधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्याला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारही करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्नही झाला. जर ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली तर तिथे पराभव होईल हा मेसेज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नेतृत्वाला दिला आहे. हेमंत गोडसेंबाबत त्यांच्या मनात मोठी नाराजी आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे.
शिंदे गट नाशिकची जागा सोडणार?
हेमंत गोडसेंना भाजपकडून होणारा विरोध, राष्ट्रवादी काँग्रेसनं जागेवर केलेला दावा यामुळे शिवसेना शिंदे गट बॅकफूॉवर गेलेला दिसतोय. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या मुलानं जाहीर सभेत हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली. मात्र अधिकृत यादीमध्ये मात्र गोडसेचं नाव नव्हतं. उमेदवारीसाठी गोडसेंनी समर्थकांसह वर्षा बंगलाही गाठला होता. पण निर्णय काही झाला नाही. ही जागा तशी शिवसेनेची. पक्षात फुट पडल्यानंतर हेमंत गोडसेंनी ठाकरें ऐवजी शिंदेची साथ दिली. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी शिंदे गटाच अपेक्षा आहे. त्यामुळे अजूनही शिंदे गटानं या जागेवरचा दावा सोडलेला नाही.
नाशिक लोकसेभेतील बलाबल |
नाशिक पूर्व | भाजप |
नाशिक पश्चिम | भाजप |
नाशिक मध्य | भाजप |
सिन्रर | राष्ट्रवादी काँग्रेस |
देवळाली | राष्ट्रवादी काँग्रेस |
इगतपूरी | काँग्रेस |