Akola News: 5 तासांत आरोपी जेरबंद, पण नातेवाईक आक्रमक; अकोल्यातील काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणात नवा खुलासा

Hidayat Patel Murder Case, Akola : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Hidayat Patel Murder Case, Akola : हिदायत पटेल हे मोहाळा गावात असताना एका इसमाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Hidayat Patel Murder Case, Akola : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या निधनाने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अकोट तालुक्यातील मोहाळा येथे त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

या घटनेनंतर निर्माण झालेला तणाव आणि नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने आणि सखोल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर कुटुंबीयांनी पार्थिव ताब्यात घेतले असून आता पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे मोहाळा गावात असताना एका इसमाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की आरोपीने चाकूने पटेल यांच्या पोटात आणि मानेवर दोन ते तीन खोल वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पटेल रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. 

त्यांना तातडीने उपचारासाठी अकोट येथे हलवण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यात नेण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News : समलिंगी नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश, संशयाचं भूत अंगात संचारलं अन् अकोला हादरलं )
 

मुख्य आरोपीला अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हल्ला करून पसार झालेल्या उबेद पटेल याला पोलिसांनी अवघ्या 5 तासांत पणच येथून ताब्यात घेतले. मुख्य आरोपीला अटक झाली असली तरी या हत्येमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. हा प्रकार जुन्या वादातून घडला की यामागे काही मोठे राजकीय षडयंत्र आहे, या दिशेने आता तपास केला जात आहे.

नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा आणि पोलिसांचे आश्वासन

हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर अकोल्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रुजमा यांच्यासह अन्य चार संशयितांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवर केला जाईल असे आश्वासन दिले.

Advertisement

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या घटनेचा संपूर्ण तपास आता IPS दर्जाचे अधिकारी अकोटचे एसडीपीओ निखिल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तपासाचा भाग म्हणून मुख्य आरोपीची नार्को टेस्ट देखील केली जाणार आहे. याशिवाय सर्व संशयित आरोपींचे मोबाईल SDR, CDR आणि व्हाट्सअप कॉलसह इतर डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी केली जाईल. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.


पोलीस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी पटेल यांचे पार्थिव ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर हिदायत पटेल यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी त्यांच्या मोहाळा या मूळ गावाकडे रवाना करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement