- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये भाजपच्या रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे
- या प्रभागातील जागा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव असून विरोधी पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत
- भाजपने कल्याण डोंबिवली महापालिकेत आपले खाते उघडले असून हा निकाल राज्यातील महापालिकांमध्ये पहिला ठरला आहे
अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी शेवटची तारीख होती. दुपार पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. त्यानंतर कोण विरुद्ध कोण हे चित्र स्पष्ट होणार होते. त्यानुसार हे चित्र स्पष्ट झाले. पण प्रभाग क्रमांक 18(अ ) मध्ये सर्वांनात चकीत तर केलेच पण बुचकळ्यातही टाकले. कारण या ठिकाणी चक्क भाजपच्या बाजूने निकाल लागला आहे. भाजप उमेदवाराच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज आला नाही. त्यामुळे हा उमेदवार आपाओप बिनविरोध निवडून आला आहे. त्याची अधिकृत घोषणा अर्ज छाननीनंतर केली जाईल.
केडीएमसीत भाजपाने आपले खाते उघडले आहे. केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक 18( अ ) ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव होती. या प्रवर्गाच्या जागे करता भाजपने रेखा राजन चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात ठाकरे बंधू किंवा काँग्रेस आघाडीचा उमेदवार त्यांना अपेक्षित होता. पण अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या विरोधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्या मुळे भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांची बिन विरोध निवड झाली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. उद्याच्या निवडणूक अर्ज छाननी अंती त्याच्या विजयाची घोषणा केली जाईल. त्यामुळे ना प्रचार ना निवडणूक होता भाजपने आपले खाते कल्याण डोंबिवली महापालिकेत उघडले आहे. राज्यातील महापालिकांमधील हा पहिला निकाल ठरणार आहे. त्यामुळे रेखा चौधरी यांनी बुधवारची वाट पहावी लागणार आहे. त्यांच्या बिनविरोध घोषणेची आता फक्त औपचारीकता राहीली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे आणि मनसेची युती आहे. काँग्रेस वंचित ही मैदानात आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असं सांगितलं जात आहे. पण अशातच भाजपने आपलं खातं कल्याण डोंबिवलीत उघडलं आहे. ही भाजपसाठी चांगली सुरूवात म्हणावी लागेल. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीसारख्या मोठ्या महापालिकेतील एका वार्डमध्ये विरोधकांना उमेदवाराच मिळू नये याबाबत आश्चर्य वक्त केले जात आहे.