पुण्यात भाजपामधील नाराजी उघड! उमेदवारी न मिळाल्यानं शहराध्यक्ष बंडखोरी करणार?

Pune BJP : पुणे भाजपाअध्यक्ष धीरज घाटे कसबा मतदारसंघातून इच्छूक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे (फोटो - @DheerajGhate/X)
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीनं 22 उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी (27 ऑक्टोबर 2024) रोजी जाहीर केली. या यादीमध्ये पुणे आणि शहर परिसरातील कसबा, पुणे छावणी आणि खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली आहे. रासने यांची उमेदवारी जाहीर होताच पुणे भाजपामधील नाराजी उघड झालीय. पुणे भाजपाअध्यक्ष धीरज घाटे कसबा मतदारसंघातून इच्छूक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असं घाटे यांनी स्पष्ट केलंय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जात होता. पण, 2023 साली झालेल्या पोटनिवडणुकी काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला होता. यंदा कसब्यामधून भाजपाकडून हेमंत रासनेंसह धीरज घाटे देखील इच्छूक होते. पण, पक्षानं पुन्हा एकदा रासनेंना उमेदवारी दिल्यानं घाटे यांनी नाराजी व्यक्त केलीय. 

पक्षानं मला चौथ्यांदा डावललं त्याचं वाईट वाटत आहे. पक्षानं कुठल्या आणि कुणाच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं हे मला कळत नाही. मी खूप वर्ष पक्षासाठी काम केलं पक्षाने मला तरी संधी नाही दिली. राज्यात हिंदुत्ववादी सरकार हवे मग हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट का नाही, असा सवाल घाटे यांनी विचारला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे पुणे भाजपाअध्यक्ष बंडखोरी करणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Congress Candidate List : 'पक्षानं निर्णय बदलवा', तिसऱ्या यादीत नाव येताच काँग्रेसमधील नाराजी उघड )

काय म्हणाले घाटे?
 
कसबा विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर जनभवावना होती की भाजपानं धीरज घाटे सारख्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. गेली 30 वर्ष हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून काम करत आज भाजपाकडं उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. पक्षाचा शहराचा अध्यक्ष या नेत्यानं मला वाटत होतं की पक्ष नेतृत्त्वानं योग्य तो निर्णय करणे अपेक्षित होतं. पण पक्षानं त्यांना जो योग्य वाटतो तो निर्णय केला. 

स्वाभाविकच माझ्यावर प्रेम करणारे, हिंदुत्वावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांची नाराजी आज पक्षानं ओढावून घेतली असं माझं मत आहे. मी जग गेल्या 30 वर्षांच्या कार्यकाळामध्ये सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता म्हणून काम सुरु केलं आणि इथपर्यंत पोहोचलो. मी यापूर्वी स्व. गिरीश बापट शेवटची विधानसभा निवडणूक लढले त्यावेळी पक्षाकडं इच्छा व्यक्त केली. मुक्ताताईंच्या वेळी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी पक्ष नेतृत्त्वानं मला थांबण्याचा सल्ला दिला. पोटनिवडणुकीच्या वेळी उमेदवारी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी सर्वेमधून हेमंत रसणे पुढे आहे, असं सांगितलं.

Advertisement

आज चौथ्यांदा उमेदवारी मागितली. लोकांमध्ये फिरतानाही उमेदवारी मिळावी अशी भावना होती. पण, पक्षानं विचार केला नाही यासारखी खेदाची भावना नाही.  तुम्हाला राज्यात हिंदुत्वाचं सरकार हवंय पण, हिंदुत्वावादी कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय ही माझी भावना, पुढचा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांशी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांशी, मला मार्गदर्शन करणाऱ्या आप्तेष्ट मंडळींशी चर्चा करुन लवकरच पक्षनेतृत्त्वाकडं माझा निर्णय मी सांगेन.

( नक्की वाचा : लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने )

मी ज्या संस्कारात वाढलो तीच माझी अडचण असावी. आज मला डावलण्याचं कारण नव्हतं. सामान्य माणूस असं म्हणतोय की धंगेकरांना पराभूत करण्यासाठी धीरज घाटेंना उमेदवारी द्यावी. ही जनभावना असताना असा कोणता सर्वे केला मला माहिती नाही, पक्षानं हा निर्णय केला तो त्यांना लखलाभ आहे. मी कायमच चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. प्रत्येक वेळी अनुशासननाध्ये काम करणाऱ्य़ांना अन्याय होत असेल तर गृहित धरलो जातो ही भावना निर्माण होते. 30 वर्ष माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण होतोय ती भावना मी पोहचवली आहे, असं घाटे यांनी स्पष्ट केलं.
 

Advertisement
Topics mentioned in this article