Maharashtra Municipal Corporation Election 2026 : महाराष्ट्रातील पालिका निवडणुकीचं मतदान १५ जानेवारी रोजी पार पडलं. यावेळी अनेक जिल्ह्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. या मतदानात बोटांवर लावली जाणारी शाई सर्वाधिक चर्चेत होती. अनेक ठिकाणी मतदानानंतर बोटांवर लावलेली शाई सहजपणे नेलपेन्ट रिमुव्हरने पुसरली जात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. विरोधकांसह मंत्र्यांनीही दुबार मतदानाची भीती व्यक्त केली.
दरम्यान ज्या मार्करने मतदारांच्या बोटावर शाई लावली जात होती, त्या मार्करची कंपनी चौकशीच्या घेऱ्यात सापडली आहे. राज्यातील अनेक ठिकाणांहून या शाईबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोरेस कंपनी चौकशीच्या फेऱ्यात...
मतदारांच्या बोटावर शाई लावण्यासाठी कोरेस कंपनीच्या मार्करचा वापर करण्यात आला होता. शाईच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या कंपनीची चौकशी करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. याशिवाय पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत कोरेस न वापरता म्हैसूर इंक कंपनीची शाई वापरण्याचे आयोगानं ठरवले आहे.
नक्की वाचा - Election 2026 Fact Check : मार्करने बोटाला लावलेली शाई पुसली जाते? बोगस मतदानाची मंत्र्यानेच वर्तवली भीती
यंदा शाईऐवजी मार्करचा वापर...
यंदा निवडणूक आयोगाकडून बोटांवर शाईऐवजी पेन वापरलं जात आहे. साध्या नेलपेन्ट रिमुव्हरने बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायजरनेही ही शाई पुसली जात होती. विशेष म्हणजे सत्तेत असलेले मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री यांनीही अशा घटनेतून दुबार मतदानाची भीती व्यक्त केली आहे.
कोरेस कंपनी कोणती आहे?
विल्हेल्म कोरेस्का (Wilhelm Koreska) यांनी या ब्रँडची सुरुवात केली. परंतु १९५६ मध्ये के. एल. थिरानी यांनी भारतीय व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. एकेकाळी स्टेशनरीसाठी ओळख असलेल्या या कंपनीने इतर क्षेत्रातही कार्यरत आहे. बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी करन्सी काउंटिंग मशीन (नोट मोजण्याचे यंत्र) या कंपनीकडून तयार करण्यात आले आहेत. कोरेस कंपनी औषध निर्मिती क्षेत्रातही आहे. रोहा (रायगड) येथे त्यांचा मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, जिथे श्वसनाचे विकार आणि मधुमेहावरील औषधांचे घटक (APIs) तयार केले जातात.