दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर या दोन नेत्यांमुळे लातूरची आजही राजकीय वर्तुळात ओळख आहे. विलासरावांनी राज्यात तर शिवराज पाटील यांनी केंद्रात लातूरचं प्रतिनिधित्व केलं आहे. विलासराव देशमुखानंतर अमित देशमुख त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. अमित 2009 पासून लातूर शहराचे आमदार आहेत. तर त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. यंदाही अमित आणि धीरज या देशमुख बंधूंना काँग्रेसनं उमेदवारी दिलीय. लातूर शहरात अमित देशमुखांविरुद्ध भाजपानं शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चाकूरकर घराण्याचा राजकीय इतिहास
शिवराज पाटील चाकूरकर 1980 साली सर्वप्रथम लातूरचे खासदार झाले. त्यांनी 1980 ते 2004 या काळात लातूरचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. या कारकीर्दीमध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळली. लोकसभा अध्यक्ष म्हणून देखील काम केलं.
केंद्रीय यूपीए सरकार पहिल्यांदा सत्तेवर आलं तेव्हा म्हणजेच 2004 साली शिवराज पाटील केंद्रीय गृहमंत्री बनले. गांधी घराण्याशी जवळीक असल्यानं तेव्हा लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही चाकूरकरांना मोठी जबादारी देण्यात आली होती. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
( नक्की वाचा : मोठी बातमी : भाजपाचं तिसऱ्या यादीमध्ये धक्कातंत्र, वाचा 25 उमेदवारांची संपूर्ण यादी )
मतदारसंघांच्या फेरचनेत लातूरचा लोकसभा मतदारसंघ राखीव झाला आणि शिवराज पाटील हे सक्रीय राजकारणातून बाजूला झाले. त्यानंतर ते पाच वर्ष पंजाबचे राज्यपाल होते. शिवराज पाटील राजकारणातून दूर असले तरी त्यांच्या घरातील सदस्य राजकारणात सक्रीय होते. त्यांचा मुलगा शैलेश पाटील तसंच सून अर्चना पाटील राजकारणात सक्रीय होत्या.
अर्चना पाटील 2019 साली लातूर ग्रामीणमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या. पण, काँग्रेसनं त्यांची निराशा करत धीरज देशमुखांना उमेदवारी दिली. या सेटबॅकनंतरच त्यांना पक्षात आणण्यासाठी भाजपा नेते प्रयत्नशील होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्चना पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी
अर्चना पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरच त्या अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणार ही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. भाजपानं तिसऱ्या यादीमध्ये त्यांचा समावेश करत त्यावर शिक्कामोर्तब केलं.
( नक्की वाचा : निवडणुकीच्या फडात नात्यात कुस्ती! नवी मुंबई ते गडचिरोली, व्हाया बारामती! )
अमित देशमुखांना किती आव्हान?
शिवराज पाटील यांचे राजकीय शिष्य समजले जाणारे माजी आमदार बसवराज पाटील, शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अर्चना पाटील यांनाही पक्षात घेऊन भाजपानं अमित देशमुखांच्या गढीला आव्हान देण्याची तयारी पूर्वीपासूनच सुरु केली होती.
लातूर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे. अर्चना पाटील त्याच समाजातील आहेत. या मतदारांनी शिवराज पाटील यांना नेहमीच साथ दिलीय. विलासराव देशमुखांच्या 1999 साली झालेल्या पराभवात लिंगायत मतदारांची भूमिका निर्णायक ठरली होती.
अमित देशमुख हे मराठा उमेदवार आहेत. त्याचबरोबर जरांगे फॅक्टरचाही भाजपाला धोका आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी लिंगायत समाजातील तगडा उमेदवार देऊन भाजपानं मोठी राजकीय चाल खेळली आहे.
( नक्की वाचा : ठाकरेंचा नातेवाईक ते भाजपामधून आयात उमेदवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीची 5 वैशिष्ट्य )
अर्चना पाटील यांची स्वच्छ राजकीय प्रतिमा, सामाजिक कामातील त्यांचा सक्रीय सहभाग तसंच एक सुशिक्षित महिला म्हणून मतदारांवर असलेली छाप हे फॅक्टर देखील या निवडणुकीत महत्त्वाचे ठरु शकतात. लातूर शहरात भाजपाचीही पारंपारिक मतं आहेत. त्यांचा देखील अर्चना पाटील यांना फायदा होणार आहे.
त्याचबरोबर अमित देशमुख 2009 पासून सातत्यानं लातूर शहराचे आमदार आहेत. त्यामुळे यंदा बदल करण्यास इच्छूक असलेल्या, तसंच काठावरच्या मतदारांनाही अर्चना पाटील यांच्या रुपानं समर्थ पर्याय मिळाला आहे.
अर्चना पाटील यांच्या बाजूनं काही फॅक्टर नक्की आहेत. पण, लातूर शहरात अमित देशमुखांचा पारंपारिक मतदारही मोठ्या प्रमाणात आहे. भाजपाचा उमेदवार ठरण्यापूर्वीच त्यांनी प्रचारात आघाडी घेतलीय. भाजपामध्ये अंतर्गत गटबाजीची चर्चा नेहमीच रंगते. या गटबाजीमुळेच अर्चना पाटील यांचं नाव जाहीर होण्यास उशीर झाला असं मानलं जातंय. दुसरिकडं काँग्रेसमध्ये अमित देशमुखांना कोणतंही प्रबळ आव्हान नाही.
विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील यांनी साधारण एकाच काळात काँग्रेस पक्षातून राजकारण सुरु केलं. विलासराव राज्यात तर शिवराज पाटील केंद्रात असा त्यांचा समांतर प्रवास होता. आता त्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रीय आहे. या निवडणुकीत ती आमने-सामने आलीय. लातूर शहराच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या दोघांच्या पुढच्या पिढीतील व्यक्तींंमध्ये होणाऱ्या या थेट लढाईकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.