आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाने स्थानिक पातळीवरील युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना 'फ्री हँड' दिला आहे. मात्र, या निर्णयासोबत एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती करू नका असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पक्षाच्या महिला विभागाची दोन दिवसीय बैठक मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे सुरू आहे. या बैठकीच्या पहिल्याच दिवशी पक्ष नेतृत्वाकडून अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा या सुचना करण्यात आल्या.
पक्षाचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानुसार युती किंवा आघाडी करण्याबाबत निर्णय घेऊ शकतील अशी सुट त्यांना देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांच्यासोबतच इतर समविचारी स्थानिक पक्षांशी युती करण्याची शक्यता या निर्णयामुळे वाढली आहे. त्याच बरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्या सोबतही स्थानिक पातळीवर युतीचे दरवाजे शरद पवार यांनी खुले ठेवले आहेत.
नक्की वाचा - Maharashtra Politics: महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेसचा मनसेसोबत जाण्यास नकार
एकीकडे महायुतीतील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत युती करण्यात शरद पवार हे सकारात्मक आहेत. पण त्याच वेळी त्यांनी भाजपसोबत कोणत्याही स्थानिक निवडणुकीत युती करू नये असे स्पष्ट केले आहे. स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणे पाहून युती किंवा आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला अधिक लवचिकपणे काम करता येईल.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यामुळे स्थानिक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री हँड दिल्याचीच चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. असं असलं तरी त्यांनी भाजप पासून दोन हात दुर राहण्याचेच ठरवले आहे. पण शिंदे आणि अजित पवारांबाबत लवचिक भूमीका घेतली आहे. त्याला आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे ही गरजेचे आहे. अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष ताकदीने मैदानात उतरणार आहेत. तशी तयारी ही त्यांनी सुरू केली आहे.