लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात हैदराबादमध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. हैदराबादमध्ये ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भाजपाच्या माधवी लता यांच्यात लढत होत आहे. हैदराबादमध्ये मतदान सुरु असतानाच माधवी लता अडचणीत आल्या आहेत. त्यांनी मतदान केंद्रावर बुरखा घालून आलेल्या मुस्लीम महिलांना त्यांचा चेहरा दाखवण्याची सूचना केली. या प्रकाराचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात माधवी लता यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी रोनाल्ड रॉस यांनी NDTV ला सांगितलं. कोणत्याही उमदेवाराला ओळख पटवण्यासाठी कुणाचा बुरखा काढण्याचा अधिकार नाही. उमेदवाराला काही शंका असेल तर तो निवडणूक अधिकाऱ्याकडं मतदाराची ओळख तपासण्याची मागणी करु शकतो,' असं त्यांनी स्पष्ट केलं.
माधवी लता यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी एक उमेदवार आहे. कायद्यानुसार एका उमेदवाराला बिना फेसमास्कचे ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. मी पुरुष नाही. मी एक महिला आहे. मी त्यांना अत्यंत नम्रपणे विनंती केली होती. याचा कुणी मोठा मुद्दा बनवत असेल तर ते घाबरले आहेत, असा अर्थ आहे.'
( नक्की वाचा : Super Exclusive : NDA 400 पार कसं करणार? केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलं NDTV वर उत्तर )
ओवैसी यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, त्यांनी व्हायरल व्हिडिओ ट्विटर टाईमलाईनवर शेअर केलाय. तर भाजपा उमेदवारानं मतदार यादीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप केलाय. 'पोलीस कर्मचारी अतिशय सुस्त वाटत आहेत. ते सक्रीय नाहीत. तसंच कोणतीाही तपासणी करत नाहीत. वरिष्ठ नागरिक असलेले मतदार इथं येत आहेत. त्यांचं नाव मतदार यादीतून हटवण्यात आलंय,' असा आरोप त्यांनी केला.