cVIGIL App to report model code of counduct violations : राष्ट्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यंदा एकूण सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यासाठी संपूर्ण देशभर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचं उल्लंघन होत असलेलं आढळलं तर काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावर निवडणूक आयोगानं तोडगा काढलाय. आता सर्वसामान्य मतदारांनाही याबाबतची थेट तक्रार निवडणूक आयोगाकडं करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगानं सीव्हिजिल (cVIGIL) सिटीझन ॲप विकसित केलंय. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत कारवाई केली जात आहे.
सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.
कसा वापर करावा?
एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.
या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. त्याचबरोबर हे ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकलाही मदत करणारे आहे. या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.