लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून अनेकांना धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील अनपेक्षित निकाल पाहून भाजप खोटात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाकडून आलेल्या निकालानुसार, काँग्रेस 13, भाजप 9, उद्धव ठाकरे गट 9, शरद पवार गट 8, शिंदे गट 7, अजित पवार गट 1 आणि अपक्ष 1 जागा मिळाल्या आहेत.
महाविकास आघाडी 31 जागांवर विजय मिळवून मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे महायुती केवळ 17 जागा टिकवू शकली आहे. महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. फोडाफोडीचं राजकारण, ईडी-सीबीआयच्या विरोधकांवर होणाऱ्या कारवाया, बेरोजगारी, महागाई या स्थानिक विषयांना दिलेली बगल यांसारख्या अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात महायुतीला जबरदस्त फटका बसला. राज्याच्या विकासाचं नाव घेत भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मतदारांनी नाकारलं असून ते सपशेल फेल ठरले आहेत.
महाराष्ट्राचा चाणक्य फक्त एकच हे शरद पवारांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरे गटाकडून सुरू असलेला प्रचार आणि काँग्रेसच्या जोडो भारत यात्रेचा परिणाम महाराष्ट्र, उत्तर प्रदेशात सकारात्मक पाहायला मिळाला.
या निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव करण्यात आला. एकेकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांनाही आपली जागा कायम राखता आली नाही. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र भाजपमध्ये अनेक नेते सपशेल फेल ठरले.
पंकजा मुंडे - बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे विजयी झाले आहे. त्यांना 6,83,950 मतं मिळाली आहेत, तर पंकजा मुंडे यांना 6,77,397 मतं मिळाली आहेत. 6,553 मतांनी पंकजा मुंडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सुरुवातीला मतमोजणीदरम्यान पंकजा मुंडे आघाडीवर होत्या, मात्र 25 व्या फेरीपासून त्यांची आघाडी घटत गेली. 2019 च्या विधानसभेत त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडेंना पुन्हा संधी मिळणार की नाही याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. यावेळी भाजप श्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांची बहीण बीडमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना संधी दिली. मात्र विधानसभेनंतर लोकसभेच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत.
नक्की वाचा - तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर
भारती पवार - दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर भगरे तब्बल 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजयी झाले आहेत. मतमोजणीपूर्वी भारती पावार यांनी एक लाखांच्या लीडने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र तेवढ्याच मतांनी त्यांचा पराभव झाला. कांदा हा या मतदारसंघात चर्चेचा विषय होता. भारती पवार या केंद्रीय राज्यमंत्री आहेत. भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक असून त्यांचं कुटुंबीय उच्चशिक्षित आहे. सुरुवातीला गावाचे सरपंचपद, राष्ट्रवादीचे शाखाप्रमुख, पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यांनी खेडगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. आपण खासदार होऊ हे त्यांनी स्वप्नातही पाहिलं नसावं, जिल्हा परिषद सदस्यातून आता ते थेट खासदार झाले आहेत.
सुधीर मुनगंटीवार - प्रतिभा धानोरकर यांना तब्बल सात लाखांहून अधिक मतं मिळाली असून थेट 2 लाख 60 हजारांचं लीड मिळवलं आहे. सुधीर मुनगंटीवारांसाठी हा मोठा धक्का आहे. सहा वेळा आमदार, तीन वेळा मंत्री राहिलेल्या मुनगंटीवारांकडे निवडणुका लढवण्याचा आणि व्युहरचना आखण्याचा चांगला अनुभव आहे. त्याशिवाय ते चंद्रपुरातून पालकमंत्री असल्याकारणाने त्यांच्याकडे जमेची बाजू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेऊन मुनगंटीवारांचा प्रचार केला. मात्र तरीही त्यांना आपली जागा राखता आली नाही.
कपिल पाटील - 2021 मध्ये केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री झालेले कपिल पाटील यांचा शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी पराभव केला. बाळ्या म्हात्रे यांना 4,99,464 मतं मिळाली असून कपिल पाटील यांचा 66,121 मतांनी पराभव करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पंचायती राज्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या अपयशाने भाजपला मोठा धक्का बसला आहेौ. भिवंडी, पालघर या मतदारसंघात संघ आपलं जाळं पसरवत आहे. येथील काही पट्ट्यात शिंदेंच्या शिवसेनेचाही जोर आहे. दरम्यान या भागातील मुरबार विधानसभेचे आमदार यांनी भाजपविरोधी काम केल्याचा आरोपी भाजप नेते जगन्नाथ पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
रावसाहेब दानवे :2019 च्या निवडणुकीत तीन लाखांहून जास्त मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे यांना यंदाच्या निवडणुकीत जबर फटका बसला आहे. रावसाहेब दानवे यांना 4,97,939 मतं मिळाली असून काँग्रेसचे कल्याण काळे 1 लाखांहून अधिक लीड घेत 6,07,897 मतं मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपचे रावसाहेब दानवे सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे दानवेंची जालना मतदारसंघात मजबूत पकड होती. यंदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांना फटका बसल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
सुभाष भामरे - धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपचे सुभाष भामरे यांचा 3,831 मतांच्या लीडने पराभव केला आहे. शोभा बच्छाव यांना 5,83,866 मतं मिळाली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कलम 370 राम मंदिर यासह विविध मुद्दे चर्चेत आल्याने नाराज झालेल्या मुस्लिम मतदारांकडून काँग्रेसला पसंती मिळेल, असे देखील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा डॉ. शोभा बच्छाव यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
सुनेत्रा पवार - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारलीय. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वहिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय. या निकालामुळे बारामतीवर शरद पवारांचंच वर्चस्व असल्याचं सिद्ध झालंय.या मतदारसंघातून सुप्रिया सुळे 7,32,312 मतांनी विजयी झाले आहेत तर सुनेत्रा पवार यांना 5,73,979 मतं मिळाली आहे. सुप्रिया सुळेंना तब्बल 1,58,333 मतांची लीड मिळाली आहे. अजित पवार त्यांच्या काकांची साथ सोडून महायुतीत सहभागी झाले. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण, आपल्या घरातील व्यक्तीला खासदार करण्यात अजित पवारांना पुन्हा एकदा अपयश आलंय. गेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता.
उज्वल निकम - उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून वर्षा गायकवाड आणि महायुतीकडून भाजपच्या तिकीटावर उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली होती. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या उज्वल निकमांना या मतदारसंघातून विजय मिळवता आहे. त्यांना विजय मिळवून देण्यासाठी भाजप आशिष शेलारही मैदानात उतरले होते. मात्र काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी ही जागा राखली.त्यांना या जागेवरुन 16,514 मतांची आघाडी मिळाली आहे. तर उज्वल निकम यांना 4,29,031 मतं मिळाली आहेत.
राहुल शेवाळे - मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई 3,95,138 मत मिळाली आहे. तर येथील दोन वेळा खासदार राहिलेले राहुल शेवाळेंविरोधात 50 हजारांहून अधिक मतांचा लीड मिळाला आहे.