लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यानंतरचा गदारोळ अजून शांत झालेला नाही. त्यातच आता मणिशंकर अय्यर यांनी पक्षाला अडचणीत आणलंय. पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, असं मत अय्यर यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलंय. अय्यर एवढ्यावरच थांबले नाहीत तर पाकिस्तानचा आदर केला नाही तर ते आपल्यावर अण्विक हल्ला करण्याचा विचार करुशकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मणिशंकर अय्यर यांनी सांगितलं की, 'पाकिस्तानमध्ये दहशतवादी आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही हे सध्याचं सरकार का सांगतं हे मला कळत नाही. पाकिस्तानमधील दहशतवाद समाप्त करण्यासाठी चर्चा आवश्यक आहे. तो एक स्वतंत्र देश आहे. त्याला ही प्रतिष्ठा आहे. ती प्रतिष्ठा कायम ठेवून तुम्हाला जितकं कठोर बोलता येईल तितकं बोला. पण, चर्चा करा. तुम्ही तर बंदूक घेऊन फिरत आहात. तुम्ही त्यांचा आदर केला तर बॉम्बचा विचार करणार नाहीत. तुम्ही त्यांना झिडकारलं तर एखादा माथेफिरु तिथं येईल आणि तो बॉम्ब कढेल. त्यानंतर काय होईल?' असा प्रश्न अय्यर यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारला आहे.
( नक्की वाचा : 'रंगभेद' वक्तव्य भोवले, सॅम पित्रोदा यांचा राजीनामा )
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर भाजपानं जोरदार टीका केलीय. काँग्रेसचे नेते भारतामध्ये राहतात, पण पाकिस्तानची भाषा बोलतात. काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे नेते मतांसाठी तृष्टीकरण करतात तसंच पाकिस्तानचा पाठिंबाही घेतात. विदेशी शक्तींचा हाथ काँग्रेससोबत आहे, हे स्पष्ट झालंय, अशी टीका भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी केलीय.
पित्रोदा यांचं वादग्रस्त वक्तव्य
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांना वादग्रस्त वक्तव्यामुळेच राजीनामा द्यावा लागला होता. भारतामधील पूर्वेतील लोकं चायनीज लोकांसारखे, पश्चिमेतील अरब, उत्तरेतील गोरे आणि दक्षिण भारतामधील लोकं आफ्रिकन व्यक्तींसारखे दिसतात, असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलं होतं. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधकांनी जोरदार टीका केली. हा मुद्दा निवडणुकीच्या काळात तापणार हे लक्षात येताच पित्रोदा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी सोडलं.