लोकसभा निवणूक 2024 चे निकाल काही तासांमध्येच हाती येणार आहेत. आज सकाळी ( 4 जून, मंगळवार) 8 वाजता मतमोजणी सुरु होत आहे. सुरुवातीला पोस्टल व्होटिंगची मतमोजणी होईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. यंदा सात टप्प्यात मतदान झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील NDA आणि विरोधी पक्षांची I.N.D.A. यांच्यात प्रमुख लढत होत आहे. ही मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच भाजपाच्या खात्यात एक जागा जमा आहे.
भाजपाला 1 जागा कशी मिळाली?
गुजरातमधील सूरत या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी यंदा होणार नाही. सूरत मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल यापूर्वीच विजयी झाले आहेत. सूरतमधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्याचबरोबर अन्य सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं दलाल यांना विजयी घोषित करण्यात आलं. सूरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 22 एप्रिल रोजीच त्यांना विजयाचं प्रमाणपत्र दिलं आहे.
लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 102 लोकसभेच्या जागांवर 66.14 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर 66.71 टक्के मतदान झालं. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांवर 65.68 टक्के मतदान झालंय चौथ्या टप्प्यातील 96 जागांवर 69.16, पाचव्या टप्प्यातील 49 जागांवर 62.2, सहाव्या टप्प्यातील 58 जागांवर 63.37 आणि सातव्या टप्प्यात 63.88 टक्के मतदान झालं.
( नक्की वाचा : महाराष्ट्राची गॅरेंटी कुणाला? वाचा तुमच्या मतदारसंघातील संपूर्ण विश्लेषण )
या निवडणुकीच्या वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतासह सत्तेत येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या निकालाचे प्रत्येक अपडेट, विश्लेषण आणि Video तुम्ही www.marathi.ndtv.com या वेबसाईटवर पाहू शकता.