संतोष कुलकर्णी, प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील लढाई दिवसोंदिवस चुरशीची होत आहे. या मतदारसंघातून भाजपानं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात उतरलेत. दोन्ही आघाड्यानं मातब्बर उमेदवार उतरवल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार आहे. त्याचवेळी एक नवा पेच निर्माण झालाय.
काय आहे पेच?
धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या तपशील अर्जात शेती, व्यवसाय, नोकरीचा तपशील दिला नसल्याचा आरोप निंबाळकर यांनी केलाय. त्याचबरोबर स्वत: धैर्यशील यांनीही दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर तब्बल 30 हून अधिक खटले दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. गुंडगिरी, फसवणूक यासारख्या गंभीर गुन्ह्यांचाही यामध्ये समावेश आहे.
नक्की वाचा : महायुतीमधील धुसफूस वाढली, राष्ट्रवादीचाच एक गट अजित पवारांवर नाराज!
धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जात त्रूटी आढळल्या आहेत. या दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या तपासणीत या त्रुटी आढळल्या. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत त्यांना लेखी सूचना देत कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन्ही उमेदवारांची तारंबळ उडालीय. हे उमेदवार त्यांच्या वकिलांच्या टीमसह आपली बाजू मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत लेखी सूचना देत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आमचे वकील सर्व माहिती सादर करतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलीय.
माढ्यात नव्या पर्वाला सुरुवात
गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं जिंकलेला माढा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं कंबर कसलीय. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 सभा या मतदारसंघात होणार आहेत. उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शुक्रवारी वेळापुरात एकाच व्यासपीठावर आले होते. तीस वर्षांचं राजकीय मतभेद मागं टाकत हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे माढ्यात आता नव्या पर्वाला सुरुवात झालीय.