'भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर....' गिरीश महाजनांनी सांगितलं एकच नाव

Girish Mahajan on CM Post : भारतीय जनता पार्टीचे नेते तसंच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Girish Mahajan
नांदेड:

योगेश लाठकर, प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं जागावाटपाच्या चर्चा काही प्रमाणात थंडावल्या होत्या. आता गणपती विसर्जनानंतर पुन्हा एकदा बैठकांना जोर येईल. सत्तारुढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे अनेक दावेदार आहेत. दोन्ही आघाड्यांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

भारतीय जनता पार्टीचे नेते तसंच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलं आहे. 'भाजपामध्ये एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजीच होतील. पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपाचा असेल तर देवेंद्रजी आहेत, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. ते नांदेडमध्ये बोलत होते.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

फडणवीस 2 वेळा मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते. भाजपाचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान फडणवीस यांना आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रीदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिलेच होते.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं. पण, दोन पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद झाले. उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या गटाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. भल्या पहाटे फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला होता.

Advertisement

( नक्की वाचा : '....तर फोटो आणि व्हिडिओ जाहीर करा,' खडसेंच्या दाव्याला महाजनांनी दिलं उत्तर )
 

पण, फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद फक्त अडीच दिवसच टिकलं. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली. त्यावेळी मोठा पक्ष असूनही भाजपानं शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. फडणवीस यांची सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा नव्हती. पण, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर ते उपमुख्यमंत्री बनले. 

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकी महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली. या कामगिरीची जबाबदारी स्विकारत फडणवीस यांनी उपमुख्यमंंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षाचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, पक्षानं त्यांचा राजीनामा फेटाळला.

Advertisement

महायुतीमध्ये सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाचे तीन प्रमुख दावेदार आहेत. त्याचबरोबर भाजपामधील काही नेत्यांची नावंही या पदासाठी चर्चेत असतात. 

Topics mentioned in this article