Maharashtra BJP President Ravindra Chavan : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता समाप्त झाला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत शेवटच्या टप्प्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा एक वेगळाच अवतार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एरव्ही जीन्स आणि शर्टमध्ये वावरणारे चव्हाण गेल्या काही दिवसांपासून थेट लुंगी घालून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचा हा लुंगी पेहराव सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे.
रविंद्र चव्हाण यांचा नवा लूक चर्चेत
राज्यात भाजपा आणि शिंदे सेनेच्या महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरी रविंद्र चव्हाण यांच्यासाठी कल्याण डोंबिवली हे त्यांचे होम पिच आहे. या भागात त्यांनी मेळावे आणि जाहीर सभांचा धडाका लावला आहे. मात्र, या सर्व धावपळीत त्यांचा पारंपरिक पेहराव बदललेला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चव्हाणांनी अचानक लुंगी का परिधान केली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
( नक्की वाचा : ZP Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर )
काय आहे खरे कारण?
रविंद्र चव्हाण यांच्या या नव्या पेहरावामागे कोणतेही राजकीय कारण नसून आरोग्याचे कारण समोर आले आहे. त्यांच्या गुडघ्याच्या वाटीतील गादीला त्रास झाल्यामुळे त्यांना जीन्स पॅन्ट घालणे कठीण झाले आहे.
वैद्यकीय कारणास्तव त्यांना पायाची हालचाल करताना अडचणी येत असल्याने त्यांनी पेहरावात हा बदल केला आहे. पायाला आराम मिळावा आणि हालचाल सुलभ व्हावी या उद्देशाने ते गेल्या 3 दिवसांपासून लुंगी घालून मतदारांच्या भेटीला जात आहेत.
( नक्की वाचा : Ajit Pawar : '100 कोटी पार्टीला, 10 कोटी अधिकाऱ्यांना', अजित पवारांचा भाजपावर सिंचन घोटाळ्याचा मोठा आरोप! )
वैद्यकीय तज्ज्ञांनी काय सांगितलं?
या संदर्भात अस्थिव्यंग तज्ज्ञ हरिष अफूजपूरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, जेव्हा गुडघ्याच्या वाटीतील गादी जास्त प्रमाणात सरकते, तेव्हा रुग्णाला पाय दुमडणे किंवा घट्ट कपडे घालणे अत्यंत त्रासदायक ठरते. अशा स्थितीत पॅन्ट घालणे शक्य होत नाही कारण पाय मोकळे ठेवणे गरजेचे असते. याच कारणामुळे रवींद्र चव्हाण यांना लुंगीचा आधार घ्यावा लागला आहे. चव्हाण यांनी प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात स्वत:चा त्रास बाजूला ठेवून याच पेहरावात प्रचाराची खिंड लढवली आहे.