ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये 15 हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सध्या पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, सात पोलीस उपायुक्त यांच्यासह आठ हजार पोलिसांचे संख्याबळ आहे.
त्याशिवाय आता तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त तीन पोलीस उपायुक्त नऊ सहायक पोलीस आयुक्त आणि 19 निरीक्षक तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील 80 प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील 690 अंमलदार, तीन हजार 491 होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे.
नक्की वाचा - Explainer : मतदानाच्या टक्केवारीचा वाद, 1.07 कोटी मते कशी वाढली?
केंद्रीय सुरक्षा दलासह राखीव पोलिसांच्या कंपन्या तैनात
ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) तीन कंपन्या तर राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात केली आहे. परिमंडळ दोन भिवंडीमध्येही सीआयएसएफच्या पुणे आणि धाराशिवच्या चार कंपन्या आहेत. परिमंडळ तीन कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या दोन, कर्नाटकची एक आणि पुणे ग्रामीण एक अशा पाच कंपन्या आहेत. तर, उल्हासनगर परिमंडळामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या राहणार आहेत. तर, वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून आहेत. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्याही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांची भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि इव्हीएम मशिन असलेल्या स्ट्रॉगरूमच्या ठिकाणी राहणार आहे.
एका कंपनीत 120 कर्मचारी
ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पोलिसांच्या 25 कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत 120 कर्मचारी असल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकचा हा फौजफाटा यात राहणार आहे.