Marathwada : राडा, गोंधळ, बोगस मतदान, पैसे वाटप...; मतदानाच्या दिवशी असा गाजला मराठवाडा, 24 तासात काय घडलं?

बुधवारपासून गुरुवारी उशीरा मतदान दिवस संपेपर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत पोलिसांनी अनेक ठिकाणी गुन्हे (एफआयआर) आणि अजामीनपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली.

जाहिरात
Read Time: 3 mins

Marathwada Municipal Corporation Election 2026 : छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी आणि नांदेड-वाघाळा या पाच महापालिकांमध्ये मतदानाशी संबंधित विविध उल्लंघने, चकमकी आणि प्रतिबंधात्मक कारवाया घडून आल्या. बुधवारपासून गुरुवारी उशीरा मतदान दिवस संपेपर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत पोलिसांनी अनेक ठिकाणी गुन्हे (एफआयआर) आणि अजामीनपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी भारत नगर येथील मतदान केंद्र परिसरात तणाव निर्माण झाला. शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या समर्थकांसाठी नेमण्यात आलेल्या पिक-अप आणि ड्रॉपसाठीच्या तीन वाहनांची दगडफेकीत पूर्णतः तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल न झाल्याने गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

६ आरोपींना अटक

दरम्यान, शहरातील नारेगाव परिसरात बुधवारी दोन प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये झालेल्या गटबाजीमुळे परिस्थिती तणावपूर्ण राहिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही गटांच्या सदस्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. पुढील कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि मतदारांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी संपूर्ण परिसरात रूट मार्च काढण्यात आला. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी सांगितले की, या दोन गुन्ह्यांप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे गस्त घालण्यात आली असून शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

नक्की वाचा - Election 2026 : 'ते' मार्कर कोणी पुरवले? कंपनी चौकशीच्या फेऱ्यात; जिल्हा परिषद निवडणुकीत वेगळा निर्णय

लातूर, जालना, परभणी, नांदेडमध्ये काय काय घडलं? 

- लातूरमध्ये पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, बुधवारी उशिरा एका उमेदवारासाठी मते मागताना महिलांना साड्या वाटप करत असल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थिर पथक (एसएसटी) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला. 

- जालना जिल्ह्यातही मतदानदिवशी उल्लंघनाची घटना समोर आली. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, दुसऱ्याच्या वतीने मतदान करताना एका व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात अकौग्न्येय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

- परभणीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे वाटप केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीविरोधात एक गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. कारवाईदरम्यान आरोपीकडून २५ हजार रुपये जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात इतर कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू आहे.

- नांदेड-वाघाळा येथेही याच कालावधीत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सांगितले की, पहिला गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, एका व्यक्तीने मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दुसरा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, प्रचारादरम्यान दोन उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी व शिवीगाळ झाली होती.

पाचही महापालिकांमधील पोलिसांनी मतदानदिवशी उच्च सतर्कता ठेवली होती. वाढीव गस्त, रूट मार्च आणि निगराणी पथकांच्या माध्यमातून मुक्त व निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी आणि कोणत्याही उल्लंघनावर तत्काळ कारवाई करण्यासाठी पोलिस सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील पालिकांमध्ये किती टक्के मतदान झालं?

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, परभणी आणि लातूर या पाच महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात सायंकाळी ५ वाजेनंतर मतदारांच्या प्रचंड रांगा दिसून आल्या. दिवसभर संथ गतीने चाललेल्या मतदानाने सायंकाळी अचानक उसळी घेतली. अनेक बूथवर रात्री आठ वाजेनंतरही मतदान सुरु असल्याचे चित्र दिसले. पाच महापालिकांमध्ये रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये ६० % मतदान झाले. नांदेडमध्ये ६१.७९%, जालन्यात ६१.१६ %, परभणीत ६५९९% आणि लातूरमध्ये ६०.०७% मतदान झाल्याची प्राथमिक नोंद आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये वांगस मतदान झाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.
 

Advertisement