मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारशीही संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली आहे. बीड जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अचानक त्यांची तब्येत खालावली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांना बीड दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा बडगा उगारला होता. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी 17 दिवस उपोषण केलं होतं. यानंतर राज्य सरकारकडून त्यांना मराठा आरक्षणाचं आश्वासन देण्यात आलं. मात्र मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यावर मराठा समाजाचा विरोध होता. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील प्रयत्न करीत होते. वारंवार करीत असलेल्या उपोषणामुळेही त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं जात आहे.