अर्ज भरण्याची मुदत संपताच जरांगे पाटील सक्रीय, मुस्लीम धर्मगुरुंसोबत करणार खलबतं

Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील मुस्लीम धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची 31 ऑक्टोबर रोजी भेट घेणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

Manoj Jarange Patil : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता पुढील काही दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या काळात बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रमुख पक्षांतील नेत्यांना धावपळ करावी लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांपुढे बंडखोरीचा प्रश्न उभा आहे. त्याचवेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.

मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगे गेल्या वर्षभरापासून सातत्यानं आंदोलन करत आहेत. त्यांनी या प्रश्नावर वेळोवेळी आमरण उपोषण देखील केलं आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठा, मुस्लीम आणि दलित मतांचं समीकरण जुळवण्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये धर्मगुरुंची बैठक बोलावली आहे. 31 ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगे यांचं प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यात या तीन्ही घटकांची संख्या निर्णायक आहे. त्यांचा व्होट बँक म्हणून एकत्र वापर करण्याचा जरांगे यांचा प्रयत्न आहे. या बैठकीला मुस्लीम समाजाचे धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी देखील उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी देखील सज्जाद नोमानी आणि जरांगेंची भेट झाली होती. धर्मगुरुंच्या भेटीनंतर जरांगे त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत. 

जरांगे फॅक्टरचा कुणाला फटका?

मनोज जरांगे फॅक्टरचा लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला होता. मराठवाड्यात भाजपाचा एकही खासदार निवडून आला नाही. रावसाहेब दानवे तसंच पंकजा मुंडे या दोन दिग्गज उमेदवारांनाही पराभूत व्हावं लागलं होतं. लोकसभा निवडणुकीपूर्वी तसंच नंतरही जरांगे यांनी सातत्यानं भाजपा आणि विशेषत: उपमुख्यंंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. 

Advertisement

विधानसभा निवडणुकीतही पाडापाडीचं राजकारण करणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच जाहीर केलंय. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी ते आग्रही आहेत. त्याचबरोबर त्यांनी मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही लावून धरलाय.  सज्जाद नोमानी यांची त्यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट घेतली होती. 

( नक्की वाचा :  जरांगे फॅक्टरचा सामना कसा करणार? देवेंद्र फडणवीसांनी 'NDTV मराठी' वर सांगितला फॉर्म्युला )

मराठा विरुद्ध ओबीसी

मनोज जरांगे यांची खलबतं सुरु असताना ओबीसी बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडीने मराठवाड्यात 10 उमेदवार उभे केले आहेत. नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर , बीड, लातूर  जिल्ह्यात ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत.

Advertisement

मनोज जरांगेंच्या उमेदवारांची यादी येण्यापूर्वी प्रकाश अण्णा शेंडगेंनी ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवत आघाडी घेतली आहे. ओबीसी बहुजन आघाडीकडून राज्यभरात एकूण 20 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी 10 उमदेवार मराठवाड्यात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीासी संघर्ष होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.