Mira Bhayandar मुलीला उमेदवारी नाही, आईला हार्ट अटॅक; भाजपमधील वादाला मिरा भाईंदरमध्ये भावनिक वळण

Mira-Bhayandar BJP Crisis: मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा भूकंप झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मिरा भाईंदर:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Mira-Bhayandar BJP Crisis:  मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा भूकंप झाला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याच्या धक्क्यातून भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वनिता यांना त्यांची मुलगी श्रद्धा बने हिला तिकीट मिळेल अशी त्यांना खात्री होती, मात्र नाव कापले गेल्याचे समजताच त्यांना हा तीव्र मानसिक धक्का बसला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,श्रद्धा बने यांचे नाव उमेदवारी यादीतून वगळण्यात आल्याचे स्पष्ट होताच वनिता बने यांच्यावर मानसिक दडपण आले. त्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी तातडीने त्यांना मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Thane News ठाण्यात खळबळ! प्रताप सरनाईकांच्या मुलाची निवडणुकीतून माघार; पत्रात लिहिलं माघार घेण्याचं मोठं कारण )

अन्याय झाल्याची भावना

वनिता बने या भाजपच्या महिला आघाडीतील केवळ एक नाव नसून त्या पक्षाच्या अत्यंत अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्त्या मानल्या जातात. प्रदीर्घ काळापासून त्यांनी भाजपच्या वाढीसाठी शहरात मोठे कष्ट उपसले आहेत. अनेक आंदोलने, जनहितार्थ केलेले संघर्ष आणि पक्षाच्या आदेशासाठी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेण्यापर्यंत त्यांची कारकीर्द राहिली आहे. मात्र, इतक्या वर्षांच्या निष्ठेनंतर जेव्हा मुलीला संधी देण्याची वेळ आली, तेव्हा पक्षाने पाठ फिरवल्याची त्यांची भावना आहे.

रुग्णालयात उपचार घेत असताना वनिता बने यांची एक भावूक प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी आजवर पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे. पक्षासाठी संघर्ष करताना मागेपुढे पाहिले नाही, अनेक संकटे अंगावर घेतली. मात्र, आज ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबाला डावलण्यात आले, ते पाहता पक्षाने माझ्याशी मोठा अन्याय केला आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून नेतृत्वाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement

(नक्की वाचा : BMC Election 2026: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )

भाजपच्या कॅम्पमध्ये चिंतेचे वातावरण

उमेदवारी अर्ज भरण्याचा उत्साह सर्वत्र असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांची धावपळ उडाली आहे. अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन वनिता बने यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पक्षाकडून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी तिकीट वाटपावरून निर्माण झालेला असंतोष शमवणे आता कठीण दिसत आहे. ही केवळ एका नेत्याची नाराजी नसून पक्षात मोठी गटबाजी असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालावर या घटनेचा काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. निष्ठावान नेत्यांना डावलल्याचा आरोप होत असल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेते या प्रकरणावर कशा प्रकारे तोडगा काढतात आणि नाराज कार्यकर्त्यांना कसे शांत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वनिता बने यांच्या समर्थकांनी देखील या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Advertisement